आग्रा,
road proves fatal उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बहा भागातील गढवार गावात खराब रस्त्यामुळे घडलेल्या घटनेने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारी सरकारी रुग्णवाहिका गावाबाहेर पडताना खराब रस्त्यावर अडकली. तब्बल दोन तास रुग्णवाहिका तिथेच अडकून राहिल्याने महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास मोठा विलंब झाला. अखेर रुग्णवाहिका ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आली; मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत नवजात बाळाचा मृत्यू झाला.
ही घटना २ सप्टेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात आले आहे. गढवार गावातील रहिवासी प्रदीप सिंग यांच्या कुटुंबीयांनी प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सरकारी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला होता. रुग्णवाहिका महिलेला घेऊन रुग्णालयाच्या दिशेने निघाली. मात्र, गावातून बाहेर पडताना रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने वाहन चिखल आणि खड्ड्यांमध्ये अडकले. गावकऱ्यांनी रुग्णवाहिका बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती ट्रॅक्टरला बांधून बाहेर काढण्यात आली आणि जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रुग्णालयाकडे रवाना झाली.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. रस्त्याची दुरवस्था कायम राहिल्यामुळे भविष्यात इतर रुग्णांना अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तातडीने रस्ता दुरुस्त करून त्याची नियमित देखभाल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही प्रदीप कुमार यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
उपजिल्हा दंडाधिकारी विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी तहसील दिनादरम्यान कुटुंबीयांची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानंतर ही तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) पाठवण्यात आली असून, या प्रकरणी अहवाल मागवण्यात आला आहे. विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा येथे याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. दोन गंभीर आजारी नवजात जुळ्या बाळांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी वाहतूक पोलिसांनी डीएनडी उड्डाणपुलापासून सेक्टर ३० येथील चाइल्ड पीजीआयपर्यंत ६ किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. सुमारे ३० वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेने हे अंतर अवघ्या ३ मिनिटे ५२ सेकंदांत पार केले.
या जुळ्या बाळांचा जन्म केवळ २६ आठवड्यांत मुदतपूर्व झाला असून, प्रत्येकाचे वजन सुमारे ७०० ग्रॅम आहे. गेल्या ४७ दिवसांपासून दोन्ही बाळे श्वसन आणि पचनाशी संबंधित गंभीर समस्यांशी लढत आहेत. सुरुवातीला दिल्लीतील नजफगड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना चाइल्ड पीजीआयमध्ये हलवण्यात आले. सध्या दोन्ही बाळांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उच्च-स्तरीय व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.