दहीहंडीतील डान्सवर संभाजी भिडेंचा संताप, ‘बायका नाचवणारे देशद्रोही’

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
सांगली
sambhaji bhide राज्यात डीजेबंदीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुण्यातून सुरू झालेली डीजेबंदीची मागणी आता राज्यातील विविध जिल्ह्यांतही जोर धरू लागली आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात डीजेबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अन्य जिल्ह्यांतही अशीच मागणी केली जात आहे. त्यातच दहीहंडी उत्सवात काही आयोजकांच्या स्टेजवर डान्सर नाचल्याच्या प्रकारावरून टीका होत असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनीही डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 

sambhaji bhide backs dj ban: calls for ban on dj and dolby during hindu festivals 
टाकळी येथे माध्यमांशी संवाद साधताना संभाजी भिडे यांनी हिंदू सणांमध्ये डीजे आणि डॉल्बीचा वापर करण्यास विरोध केला. “डीजे आणि डॉल्बी फेकून दिले पाहिजेत. त्याचा काय फायदा? त्यातून देशाला काय मिळते?” असा सवाल त्यांनी केला. सण-उत्सवांमध्ये काही गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि त्यामध्ये डॉल्बीचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले.
दहीहंडी उत्सवातील डान्सच्या प्रकारावरही भिडे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. सणांमध्ये अश्लील डान्स करणे आणि महिलांना नाचवणे हे प्रकार करणारे मूर्ख आणि देशद्रोही असल्याचे ते म्हणाले. हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजवला जाऊ नये, तसेच डॉल्बी फेकून दिला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दहीहंडीच्या सणामध्ये महिलांना नाचवणाऱ्यांनी चुकीचे काम केले असून, असे करणारे देशद्रोही आहेत, असेही भिडे यांनी म्हटले.
राज्यात विविध ठिकाणी डीजेबंदीची मागणी होत असताना आता संभाजी भिडे यांनीही डीजे आणि डॉल्बीविरोधात भूमिका घेतल्याने या मुद्द्यावर राजकीय तसेच सामाजिक स्तरावर काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीलाही संभाजी भिडे यांनी विरोध दर्शवला आहे. सैनिक टाकळीमध्ये होऊ घातलेल्या एमआयडीसीला पाठिंबा देणे म्हणजे पाकिस्तानला पाठिंबा देण्यासारखे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. “जमत नाही. देशासाठी जगणारी जात ही मराठा जात आहे,” असेही त्यांनी म्हटले.
या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे भिडे यांनी सांगितले. “मी बोलत नाही हे लोकांचं मत आहे. ते कोणीही असोत,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सैनिक टाकळीला सैनिकी पेशाची आग असून, ती अधिक वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही भिडे म्हणाले. “आम्हाला एमआयडीसी नको,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. भारतमातेच्या कपाळावरील स्वातंत्र्याचे कुंकू टिकवण्यासाठी जगणारी जात म्हणजे सैनिक असल्याचे त्यांनी म्हटले.
सैनिक टाकळी हे हिंदुस्थानचे भूषण असलेले गाव असल्याचे सांगत भिडे यांनी अखंड हिंदुस्थानचा मुद्दाही मांडला. देश स्वतंत्र होताना चौदा तुकडे बाजूला गेले असून, ते पुन्हा एकत्र आणू, असा दावा त्यांनी केला. अखंड हिंदुस्थान निर्माण करण्याची आग असलेली लोक या गावात आहेत, असेही संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितले.