लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण

तरुणाविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
POCSO लग्नाचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून एका प्रकरणांत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नंदनवन पोलिसांनी १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून २६ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. नंदनवन पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणातील आरोपीचे नाव ऋतिक विचूरकर (२६), रा. नंदनवन असे आहे.
 

POCSO 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी एका मैत्रिणीच्या घरी नंदनवन येथे गेली होती. त्यानंतर ती आरोपीच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. आरोपीची आई तिच्या नात्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी आरोपीची आई घरी नसल्याचे पाहून ऋतिकने तरुणीला घरात बोलावले. तिच्याशी संवाद साधत त्याने लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नाचे आश्वासन देत २०२१ ते २०२६ या कालावधीत तिचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तरुणीने लग्नाबाबत आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता त्यांनी लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे तिने पोलिसांत धाव घेतली. तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी ऋतिक विचूरकर याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.