भीषण अपघातात सहा मजुरांचा जागीच मृत्यू: ७ जण गंभीर

मृतांमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याचाही समावेश

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा शिवारातील घटना
 
गोंदिया,
six laborers killed तेलंगानात रोजगारासाठी जात असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील मजूरांच्या पिकअप वाहनाला गोंदिया - बालाघाट मार्गावरील नागरा गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात सहा मजूरांचा जागीच मृत्यू तर चालकासह सात मजूर गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका तीन वर्षीय चिमूकल्याचाही समावेश असून विरूद्ध दिशेने येणार्‍या ट्रकच्या धडकेने मजूरांच्या या पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेदा झाल्याचे दिसून आले.
 
 
six laborers killed
 
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर परिसरातील मजूर पिकअप वाहन क्रमांक एमपी-१५ टी-३४९५ मधून रोजगारासाठी तेलंगणातील जगतियाल, करीमनगरकडे निघाले होते. दरम्यान, नागरा गावाजवळ गोंदियाच्या दिशेने भरधाव येणार्‍या ट्रक क्रमांक एमएच-३५ एजे-२५४७ ने पिकअपला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, पिकअप वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात आरुष मात्रे (३), रा. सावरी, किरण संतोष वैद्य (२६), रा. लोडाना, संतोष मात्रे (३८), सुशीला मात्रे (३५), रा. किन्ही, रूपसेन सत्यकर (३५) आणि ज्योती सत्यकर (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर भूमेश्वर मात्रे (४७), संगीता मात्रे (३५), राजेंद्र पंचाले (३०), लक्ष्मी पंचाले (२७), संतोष वैद्य (३५), राकेश बाहे (२४) तसेच पिकअप चालक संदीप बाहे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहनात अडकलेल्या जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.
 
 
परिसरावर शोककळा...
रोजगाराच्या शोधात तेलंगणाकडे निघालेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याने बालाघाट तसेच गोंदिया परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच परिसरातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाले असून शोककळा पसरली आहे.