अनिल कांबळे
नागपूर,
Student Sexually Assaulted जेवन झाल्यानंतर रस्त्यावर शतपावली करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला बेशुद्ध करुन दोन अनोळखी युवकांनी लैंगिक अत्याचार केला. ही खळबळजनक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. ती विद्यार्थिनी पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणी एका खासगी करिअर अकादमीत शिक्षण घेत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. ती कोराडी परिसरात भाड्याच्या घरात राहते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, १ मे रोजी रात्री १.३० च्या सुमारास जेवण झाल्यानंतर ती घराबाहेरील गल्लीत फिरत होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी तिचा रस्ता अडविला. दोघांनीही चेहऱ्यावर कापड बांधले होते. त्यापैकी एकाने तिच्या चेहऱ्यावर कापड ठेवून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर दोघांनी तिला अंधारात नेले. तिच्यावर दोघांनीही आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला आणि तेथून पसार झाले. दोन तासानंतर शुद्धीवर आल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याचे लक्षात आले. अंधारात फेकलेले कपडे शोधून घरी परतल्यानंतर भीती आणि मानसिक धक्क्यामुळे हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी गर्भवती असल्याचे उघड
रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुलगी आपल्या मूळ गावी गेली होती. तेथे तिला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर दाखल केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे हादरलेल्या कुटुंबीयांनी युवतीला विचारणा केली असता तिने मे महिन्यात दोघांनी लैंगिक अत्याचार झाला होता, असे सांगितले. युवतीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला.
प्रेमप्रकरणातून प्रकार घडल्याची शक्यता
तरुणीचे तरुणासोबत प्रेमसंबंध असून त्याच्याकडून ती गर्भवती झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आईवडिलांच्या भीतीपोटी ती तरुणी दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा बनाव करीत असावी, अशी शक्यता कोराडी पोलिसांनी वर्तवली आहे. दुचाकीवरून आलेल्या संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच या प्रकरणातील तथ्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.