220 किमी वेगाने येतोय सुपर टायफून, पुढील 12 तासांमध्ये होणार विध्वंस

भारताच्या शेजारी देशांनी दिली चेतावणी

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
super-typhoon हवामान बदलाचे भयानक सावट आणि समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे निसर्गाने आपले अत्यंत क्रूर रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. आशियाई सागरी पट्ट्यात सध्या एका महाकाय चक्रीवादळाचे थैमान सुरू असून, ’सौडेल’ नावाचे हे विनाशकारी सुपर टायफून भारताच्या शेजारील देशांच्या उंबरठ्यावर धडकण्यासाठी सज्ज झाले आहे.

super 
वाऱ्याचा वेग ताशी २२० किलोमीटरपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने पुढील १२ ते २४ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. समुद्रात उसळणाऱ्या भयानक लाटा आणि आकाशातून कोसळणारा पाऊस यामुळे लाखो लोकांचा जीव टांगणीला लागला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरात जन्माला आलेले सौडेल हे वादळ आता कॅटेगरी-३ च्या महाचक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ सायपान बेटांपासून अवघ्या काही अंतरावर असून वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. वादळाच्या भीषणतेचा अंदाज घेऊन सायपानसह संपूर्ण उत्तर मारियाना द्वीपसमूहात ’टायफून कंडिशन-१’ लागू करण्यात आली आहे. याचा थेट अर्थ असा की, पुढील अवघ्या १२ तासांच्या आत या भागात घरे उद्ध्वस्त करणारे महाप्रचंड वारे आणि ढगफुटीसदृश पाऊस सुरू होईल.
एग्रीहान, पागन आणि अलामागन या बेटांवरील नागरिकांना तातडीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले असून संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. जागतिक पातळीवर समुद्राचे तापमान वाढवणारा अल निनो प्रभाव यंदा अधिक आक्रमक झाला आहे. त्यामुळेच प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन समुद्राच्या पट्ट्यात एकापाठोपाठ एक हिंसक चक्रीवादळे उसळत आहेत.
चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्रानेही हैनान बेटासह आपल्या संपूर्ण किनारपट्टीवर धोक्याचा इशारा दिला आहे. वर्षाच्या अखेरीपर्यंत आशिया-पॅसिफिक क्षेत्राला अशाच अनेक महापूर आणि वादळांच्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. यापूर्वी आलेल्या मायसाक चक्रीवादळाने घडवलेला विनाश अजूनही लोकांच्या डोळ्यांसमोरून गेलेला नाही. त्या वादळात सुरुवातीला कमी वाटणारी मृतांची संख्या अचानक १५९ वर पोहोचली होती. नानिंग शहरात पाण्याचा प्रचंड भार न पेलवल्याने दोन मोठे बंधारे पत्त्यांसारखे कोसळले होते, ज्यात १०७ नागरिक एका क्षणात वाहून गेले किंवा गाडले गेले.
पुराच्या पाण्यात एक मोठा स्नेक फार्म बुडाल्याने तब्बल ९०० हून अधिक विषारी साप पाण्याच्या प्रवाहासोबत थेट लोकांच्या घरात आणि रस्त्यांवर पोहताना दिसले होते, ज्यामुळे एका महिलेला दंश होऊन तिचा जागीच मृत्यू झाला होता. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लष्कराला थेट ड्रोनची मदत घ्यावी लागली होती. ’मायसाक’च्या वेळी झालेल्या चुकांमधून धडा घेत प्रशासनाने यावेळी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क केली आहे. समुद्रात गेलेल्या हजारो मच्छीमारांना आणि जहाजांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वादळाचा मार्ग किंचितही पश्चिमेकडे सरकला, तर हाहाकार उडण्याची दाट शक्यता असल्याने भारताच्या शेजारील सागरी देशांमध्ये भीतीचे दाट सावट पसरले आहे.