मुंबई
suraj chavan ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलिगत स्टार’ म्हणून लोकप्रिय असलेल्या सूरज चव्हाणच्या आयुष्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले असून दोघेही आई-बाबा झाले आहेत. जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर सूरजच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ती वेगाने व्हायरल झाली आणि चाहत्यांनी सूरज व संजनावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
लग्नानंतर अवघ्या नऊ महिन्यांनी सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. बाबा झाल्यानंतर सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लेकीच्या जन्मानंतरचा रुग्णालयातील सूरजचा पहिला व्हिडीओही समोर आला. एका चाहत्याने रुग्णालयातून शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सूरज आणि संजनाच्या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी तसेच चाहत्यांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. गर्दीतून वाट काढत सूरज संजना आणि आपल्या बाळाला भेटण्यासाठी पोहोचला.
मात्र, सूरजच्या लग्नापासून संजनाच्या डोहाळे जेवणापर्यंत प्रत्येक सोहळ्यात हक्काने सहभागी झालेली त्याची सेलिब्रिटी बहीण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर या व्हिडीओमध्ये दिसली नाही. सूरजने तिला बहिण मानले असून दोघांचेही ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडल्यानंतरही जिव्हाळ्याचे नाते कायम आहे. त्यामुळे चाहत्यांनी व्हिडीओच्या कमेंट्समध्ये ‘आत्याबाई कुठे आहेत?’ असा प्रश्न विचारला होता.
आता या प्रश्नाचे उत्तर खुद्द जान्हवीनेच दिले आहे. वेळ काढून जान्हवी रुग्णालयात पोहोचली आणि तिने सूरज-संजनाच्या चिमुकलीची भेट घेतली. यावेळी जान्हवी काहीशी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून या खास भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये जान्हवी अत्यंत आनंदी दिसत आहे. आपल्या लाडक्या भावाच्या आयुष्यात आलेल्या या नव्या आनंदाचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटले आहे. गाडीतून उतरल्यानंतर जान्हवी थेट सूरज आणि संजनाच्या बाळाच्या वॉर्डकडे धावत जाते. तेथे तिची संजनाशी भेट होते. जान्हवी संजनाला कडकडून मिठी मारते आणि त्यानंतर ती बाळाला भेटण्यासाठी जाते.
चिमुकलीला हातात घेतल्यानंतर जान्हवी काही क्षण तिच्याकडे एकटक पाहत राहते. या प्रसंगी तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचेही दिसून आले. भावाच्या आयुष्यात आलेल्या या छोट्या पाहुणीबद्दलचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसतो. एवढेच नव्हे, तर जान्हवीने संपूर्ण रुग्णालयात बर्फी वाटून हा आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, जान्हवीने शेअर केलेल्या संपूर्ण व्हिडीओमध्ये सूरज मात्र कुठेही दिसला नाही.