आयपीएलच्या धर्तीवर BBLमध्ये खासगी गुंतवणुकीला हिरवा कंदील

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
मेलबर्न,
t20 tournament big bash league ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टी-२० स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये आता खासगी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रथमच बीबीएलमधील संघांमध्ये खासगी गुंतवणूक स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी मेलबर्न रेनेगेड्सच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. २०२७-२८ हंगामापर्यंत हा संघ नव्या मालकाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
 
t20 tournament big bash league
 
क्रिकेट ऑस्ट्रेलिया मेलबर्न रेनेगेड्ससाठी इच्छुक खासगी गुंतवणूकदारांकडून बोली मागवणार आहे. त्यानंतर बीबीएलमधील अन्य संघांसाठीही अशाच प्रकारचे मॉडेल स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. मात्र, कोणता संघ विकायचा यासंदर्भातील पुढील निर्णय संबंधित राज्य क्रिकेट संस्था आणि स्थानिक समुदायाच्या हिताचा विचार करून घेतला जाणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
  
बीबीएल आणि महिला बिग बॅश लीगमध्ये गुंतवणूक वाढवून या स्पर्धांना अधिक मजबूत करणे हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेअर्ड यांनी सांगितले की, खासगी गुंतवणुकीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे दीर्घकालीन भविष्य अधिक सुरक्षित करण्यास मदत होईल. मात्र, गुंतवणूकदारांना प्रवेश दिल्यानंतरही आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, खेळाडूंची उपलब्धता, बीबीएलची वेतन मर्यादा, ब्रँडिंग, किमान क्लब परवाना शुल्क आणि गुंतवणूकदारांना मंजुरी देण्यासारख्या महत्त्वाच्या बाबींवरील नियंत्रण क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि राज्य क्रिकेट संस्थांकडेच राहणार आहे.
 
दरम्यान, खासगी गुंतवणुकीचा निर्णय घेत असताना कसोटी क्रिकेटला असलेले प्राधान्य कायम राहणार असल्याचेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. आगामी काही वर्षांत बीबीएल ऑस्ट्रेलियाच्या पारंपरिक कसोटी उन्हाळ्याच्या काळातच सुरू राहणार असून, दोन्ही स्पर्धांची वेळ एकमेकांवर येण्याची शक्यता आहे. केंद्रीय करारातील खेळाडूंसाठी कसोटी क्रिकेटला पहिली पसंती असेल. त्यामुळे बॉक्सिंग डे टेस्ट आणि न्यू इयर टेस्टसारख्या पारंपरिक कसोटी सामन्यांच्या आयोजनात बदल करण्याचे संकेत सध्या देण्यात आलेले नाहीत.