सिरोंचा,
st-bus सिरोंचा-अहेरी मार्गावर रंगयापल्ली-वढणजवळ आज मंगळवारी एसटी महामंडळाची बस आणि काळी-पिवळी प्रवासी वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत काळी-पिवळी वाहनातील सुमारे दहा प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरोंचाहून अहेरीच्या दिशेने एसटी बस जात होती. त्याचवेळी जाफराबाद येथून प्रवासी घेऊन येणार्या काळी-पिवळी वाहनाची रंगयापल्ली-वढण परिसरात एसटी बसशी समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, प्रवासी वाहनातील अनेक प्रवाशांना दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
जखमी प्रवाशांना तातडीने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी असलेल्या तिघांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अन्य जखमींवर सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामुळे सिरोंचा-अहेरी मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वाहनचालकांचा निष्काळजीपणा, रस्त्याची स्थिती अथवा अन्य कोणत्या कारणामुळे दुर्घटना घडली, याचा तपास पोलीस करीत आहेत. सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार पिल्लीवार व सातपुते यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास करीत आहेत.