वाघाच्या हल्ल्यात सालगडी गंभीर जखमी

पवनगाव येथील घटना

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
समुद्रपूर
tiger-attack पवनगाव येथे शेतात काम करीत असलेल्या सालगड्यावर वाघाने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सालगडी गंभीर जखमी झाला असून त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवार ८ रोजी ४ वाजताच्या सुमारास घडली. विशाल मून (३२) असे जखमीचे नाव आहे.
 
attack
मिळालेल्या माहितीनुसार, पवनगाव येथील शेतकरी रमेश जैस्वाल यांच्या शेतात विशाल मून हा सालगडी म्हणून काम करतो. दरम्यान, मंगळवारी विशाल मून हा शेतात काम करीत असताना वाघाने अचानक हल्ला चढवला. विशालने आरडाओरड करताच वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. विशालने घटनेची माहिती गावात फोनद्वारे दिली. गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन विशालला हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी विशालची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.
 
विशेष म्हणजे, पवनगाव शिवारात वाघ फिरत असल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक हरविर सिंग, सहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोणे, क्षेत्र सहाय्यक विकास चौधरी यांनी पवनगाव येथील शेतकर्‍यांची बैठक घेऊन वाघांची दहशत लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन सुद्धा केले होते. अशातच वाघाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पवनगाव (करूळ) परिसरात दोन वाघांचा वावर असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये दहशत आहे. वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसवावेत, वनविभागाची गस्त वाढवावी आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी राकाँ शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केली आहे.