अरे वाह्ह...अकाउंट नाही तरी व्हॉट्सॲप कॉल शक्य

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
whatsapp calls व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी लवकरच एक महत्त्वाचे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे व्हॉट्सॲप वर खाते नसलेल्या व्यक्तीलाही ग्रुप कॉलमध्ये सहभागी होता येणार आहे. Meta कडून सध्या ‘गेस्ट कॉल’ नावाच्या या फीचरची चाचणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित व्यक्तीला व्हॉट्सॲप ॲप इन्स्टॉल करण्याची किंवा वेब ब्राउझर वापरण्याची आवश्यकता राहणार नाही.
 
whatsapp calls
 
WABetaInfo च्या अहवालात या नव्या सुविधेची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, व्हॉट्सॲप अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही एका सुरक्षित लिंकच्या माध्यमातून कॉलमध्ये जोडता येणार आहे. सध्याच्या व्हॉट्सॲप गेस्ट चॅट व्यवस्थेच्या धर्तीवर हे फीचर विकसित केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे खाते नसलेल्या व्यक्तींनाही व्हॉट्सॲप च्या माध्यमातून ग्रुप कॉलचा भाग होता येईल.
 
या सुविधेचा वापर करण्यासाठी मात्र कॉल सुरू करणाऱ्या होस्टकडे व्हॉट्सॲप खाते असणे अनिवार्य असेल. होस्ट आपल्या खात्यातून गेस्ट कॉलची लिंक तयार करून ती संबंधित व्यक्तींना पाठवू शकतो. लिंक मिळाल्यानंतर समोरच्या व्यक्तीला व्हॉट्सॲप वर नवीन खाते तयार करण्याची किंवा ॲप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. अहवालानुसार, या कॉल्सनाही एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचे संरक्षण मिळणार आहे. तसेच कॉलमध्ये कोणाला सहभागी करून घ्यायचे किंवा कोणाला बाहेर काढायचे, याचा अधिकार होस्टकडे असेल.
 
दरम्यान, गेल्या महिन्यात व्हॉट्सॲप ने अनेक भारतीय वापरकर्त्यांची खाती ब्लॉक केल्याचे प्रकरणही समोर आले होते. काही वापरकर्त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची खाती बंद करण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र, व्हॉट्सॲप ने ही कारवाई नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते. प्लॅटफॉर्मच्या सेवांचा गैरवापर करणाऱ्या खात्यांवर कंपनीकडून कारवाई केली जाते, असेही सांगण्यात आले होते.
 
प्लॅटफॉर्मवरील इतर वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सामान्यतः ज्या खात्यांविरोधात तक्रारी प्राप्त होतात, त्यांची तपासणी करून कारवाई केली जाते. मात्र, काही वेळा चुकूनही खाती ब्लॉक होऊ शकतात, हे व्हॉट्सॲप ने मान्य केले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित वापरकर्त्यांचा ॲक्सेस शक्य तितक्या लवकर पूर्ववत केला जातो.