बिहार
bihar village बिहारमधील गया जिल्ह्यातील बोधगया प्रखंडातील बतसपुर गावाने सांडपाण्याच्या गंभीर समस्येवर पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील अभिनव उपाय शोधला आहे. सुमारे ३५० घरांची वस्ती असलेल्या या गावातील नाल्या आणि शौचालयांमधून बाहेर पडणारे सांडपाणी पूर्वी चार एकर परिसरात पसरलेल्या तलावात जाऊन साचत होते. परिणामी तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले होते. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना सतत दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
या समस्येवर आता ‘वेस्ट वॉटर स्टॅबिलायझेशन पॉन्ड’ अर्थात डब्ल्यूएसपी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी तोडगा काढण्यात आला आहे. नैसर्गिक प्रक्रियांवर आधारित आणि तुलनेने कमी खर्चाची ही सांडपाणी प्रक्रिया पद्धत आहे. या प्रणालीमध्ये दूषित पाणी तलावासारख्या संरचनेत ठरावीक कालावधीसाठी साठवले जाते. सूर्यप्रकाश, ऑक्सिजन, जीवाणू तसेच विविध नैसर्गिक जैविक प्रक्रियांच्या साहाय्याने पाण्यातील सेंद्रिय घाण आणि प्रदूषकांचे प्रमाण कमी केले जाते.
बतसपुरमध्ये तलावाच्या एका टोकाकडून पाणी बाहेर काढून ते तयार करण्यात आलेल्या चार स्वतंत्र चेंबरमधून सोडले जाते. या प्रक्रियेतून पुढे गेल्यानंतर प्रक्रिया केलेले पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर तलावातून येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्येत मोठी घट झाली आहे.
विशेष म्हणजे, ज्या तलावात पूर्वी गावातील गटार आणि शौचालयांचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी साचत होते, त्याच तलावाचा आता मत्स्यपालनासाठी उपयोग केला जात आहे. याशिवाय प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर शेतकरी शेतीच्या सिंचनासाठीही करत आहेत. त्यामुळे सांडपाणी ही समस्या न राहता त्याचे उपयोगी संसाधनात रूपांतर करण्याचा प्रयोग प्रत्यक्षात साकारला आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण विकासाच्या दृष्टीनेही या उपक्रमाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
या प्रयोगाची आणखी एक महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यासाठी रसायने किंवा मोठ्या प्रमाणावर वीज आणि अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता भासत नाही. नैसर्गिक पद्धतीने सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याने या प्रणालीचे संचालन तुलनेने सोपे आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कमी खर्चात सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते.
स्थानिक पातळीवर बतसपुरमधील हा बिहारमधील पहिला अशा प्रकारचा नमुना असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये घाण आणि दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावर नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करून ते पुन्हा उपयोगात आणले जात आहे. हा प्रयोग केवळ दुर्गंधीपासून ग्रामस्थांना दिलासा देणारा नसून पाण्याचा पुनर्वापर आणि संवर्धनाच्या माध्यमातून भूजल संरक्षणालाही मदत होण्याची शक्यता आहे.
गावाच्या पंचायतचे माजी उपमुखिया मनोरंजन प्रसाद समदर्शी यांनी सांगितले की, बिहारमधील हा पहिला असा नमुना आहे, ज्यामध्ये घाण पाण्याची नैसर्गिक पद्धतीने स्वच्छता करून ते वापरण्यायोग्य बनवले जात आहे. सांडपाण्याकडे समस्या म्हणून न पाहता त्याचे संसाधनात रूपांतर करण्याचा बतसपुरचा हा प्रयोग भविष्यात बिहारमधील इतर ग्रामीण भागांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.