अडीच लाखांचं कर्ज, MPSCची तयारी अन् टोकाचा निर्णय

    दिनांक :09-Sep-2026
Total Views |
पुणे,
MPSC student dies in Pune. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी असून तो एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याच्यावर अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती असून आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. मात्र, या घटनेनंतर एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
 
32543
 
गेल्या काही काळात पुण्यात विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटना चर्चेत आल्या आहेत. नीट परीक्षेतील पेपरफुटीचे पुण्याशी थेट कनेक्शन आढळल्याचे समोर आले होते, तर सीईटी परीक्षेच्या पेपरफुटीचाही मुद्दा गाजला होता. त्यानंतर एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रथमेशच्या मृत्यूने विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आर्थिक अडचणींचाही प्रश्न चर्चेत आला आहे.
 
 
या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत त्यांनी एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. भ्रष्टाचार आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, असेही सपकाळ यांनी म्हटले. अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांशी असलेल्या कथित संबंधांवरून प्रश्न निर्माण होतील, असा दावाही त्यांनी केला. प्रथमेशच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत, या घटनेनंतर तरी एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांनी पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.