नागपूर,
nagpur-marbat-festival-2026नागपूर शहराच्या सुमारे १४५ वर्षांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला ‘मारबत महोत्सव’ यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक उत्सवाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विशेष नियोजन केले आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या महोत्सवासाठी शहरात विविध ठिकाणी स्वागत मंच, सजावट आणि इतर सुविधांची तयारी करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पिवळी मारबतचे आयोजन तन्हाने तेली समाज, तर काळी मारबतचे आयोजन काळी मारबत उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असल्याची माहिती महापौर नीताताई ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाची सुरुवात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पिवळी आणि काळी मारबतची विधिवत पूजा करून झाली. मुख्य कार्यक्रम गांधीपुतळा चौक येथे होणार असून, मनपाच्या वतीने संपूर्ण महोत्सव मार्गाची सजावट, स्वागत गेट, स्वागत मंच आणि मारबतच्या स्वागताची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये स्वागत मंच
मनपाच्या वतीने कुंभारपुरा चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक, शहीद चौक, टांगा स्टँड चौक, गांधीपुतळा चौक, कोतवाली चौक तसेच मस्कासाथ येथील छोटेलाल हलवाईसमोर स्वागत मंच उभारण्यात येणार आहेत.
परदेशी वाणिज्यदूतांसह मान्यवरांची उपस्थिती
नागपूरच्या मारबत उत्सवाला जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी यंदा विशेष पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे. फ्रान्स, इटली, फिनलंड आणि नॉर्वे येथील वाणिज्यदूतांसह विविध देशांचे प्रतिनिधी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे मनपाने सांगितले आहे.
याशिवाय मंत्री, लोकप्रतिनिधी आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, जय मेहता, अभिनेते जॅकी श्रॉफ, आरती वेले तसेच संपादक निखिल खरे आदी मान्यवर महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
नेहरू पुतळा चौकात परदेशी वाणिज्यदूतांना मारबत मिरवणूक पाहता यावी, यासाठी इमारतीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण महोत्सवाचे यूसीएनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला महापौर नीता ठाकरे यांच्यासह उपमहापौर लीला हाथीबेड सत्तापक्षनेता बाल्या बोरकर, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी आणि क्रीडा सभापती दर्शनी धवड उपस्थित होते.