भाषा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम!

16 Jan 2019 13:55:22
प्रयागराज येथे महाकुंभाला शानदार सुरुवात झाली आहे. मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर महाकुंभ सुरू होत असतो, तसा तो झाला. 15 जानेवारीपासून सुरू झालेला हा महाकुंभ 4 मार्च 2019 पर्यंत चालेल. हा महाकुंभ म्हणजे भाविकांसाठी गंगास्नानाची महापर्वणीच म्हणावी लागेल. देशाच्या विविध भागांतून कोट्यवधी भाविक या काळात प्रयागराज येथे येतील आणि गंगेत पवित्र स्नान करतील. विविध भाषा, प्रांत, संस्कृती, परंपरा या सगळ्यांचा संगम या ठिकाणी अनुभवास येतो, हे भारतवासीयांचे महाभाग्यच म्हटले पाहिजे. हे कुंभपर्व आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चेतनेशी जुडले आहे, ही एक बाब जरी आपण लक्षात घेतली, तरी या कुंभाचे एकूणच महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल.

 
प्रयागराज येथील नदीसंगमावर देशभरातील विविध भाषा बोलणारे, विविध परंपरांचे पाईक असणारे, विविध प्रकारची आध्यात्मिक पृष्ठभूमी असणारे सर्व जातींचे लोक एकत्र येणार, विचारांचे आदानप्रदान करणार, ही राष्ट्रचेतना जागृत करणारी बाब म्हटली पाहिजे. ही बाब आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदपर्वणीही ठरणार आहे. हा महाकुंभ म्हणजे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक अवधारणांचे जिवंत प्रतीक मानले जाते आणि मानले पाहिजे. हा जो संगम आहे ना, अतिशय अद्भुत असा आहे, अविस्मरणीय आहे. महाकुंभाच्या निमित्ताने संगमावर पवित्र स्नान आणि पूजनाचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच; या कुंभाला ज्योतिषीय, बौद्धिक, वैज्ञानिक आणि पौराणिक आधारही आहे. तसे पाहिले तर हा जो महाकुंभ आहे, हा स्नान आणि ज्ञान यांना एकत्र आणतो आणि यातून भारताच्या अतिप्राचीन अशा संस्कृतीचे जे वैभव आहे, ते पुन:पुन्हा जगापुढे येत राहते. या दृष्टीने बघितले तर कुंभाचे महत्त्व आणखी वाढते.
 
प्रयागराज येथे सुरू झालेला महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो, यावरून या कुंभाचे महत्त्व अधोरेखित होते. प्रयागराज येथील हा महाकुंभमेळा म्हणजे मानवतेचा अमूर्त असा सांस्कृतिक वारसा असल्याची मान्यता युनेस्कोनेही दिली आहे. भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब होय. हा महामेळा भव्यदिव्य करतानाच त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कसोशीने प्रयत्न करीत आहेत, हीसुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडविताना त्यात कुठेही बेशिस्त येणार नाही, यासाठी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशचे प्रशासनही प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, यासाठी प्रशासनाचे अभिनंदनही करायला हवे. कुंभात सहभागी होण्यासाठी जे भाविक येणार आहेत, त्या सगळ्यांना अपेक्षित आनंद मिळावा, पूजा-अर्चना आणि स्नान व्यवस्थित करता यावे, त्यांना कुठेही असुरक्षित वाटायला नको, याची संपूर्ण काळजी प्रशासन घेत आहे आणि त्या दृष्टीने कडक उपाययोजनाही करण्यात आल्याचे जे अनुभवास येत आहे, त्यामागे सरकार आणि प्रशासन यांचा दृढसंकल्पच दिसतो आहे.
 
यंदाचा कुंभमेळा आणखी एका कारणाने वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. प्रयागराज या ठिकाणी जागोजागी जे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले आहेत, त्या होर्डिंग्जवर कुंभमेळ्याचा इतिहास लिहिण्यात आला आहे. त्यामुळे येणार्‍या प्रत्येकाला कुंभाचे महत्त्व, त्याच्या आयोजनाचे कारण, त्यामागची पृष्ठभूमी अशा सगळ्या बाबी लक्षात येत आहेत. अतिशय चांगला आहे हा उपक्रम. यासाठीही आपण उत्तरप्रदेशच्या सरकारचे आणि प्रशासनाचे अभिनंदन करायला हवे. ‘प्रयाग की कहानी, कुंभ की जुबानी,’ अशी संकल्पना यंदा घेण्यात आली आहे आणि ती लोकप्रियही ठरली आहे. या संकल्पनेवर आधारित शहरात केवळ होर्डिंग्जच लावण्यात आले आहेत असे नव्हे, तर चौकाचौकांत मोठमोठे टीव्ही स्क्रीन लावण्यात आले असून, त्यावर महाकुंभाचा इतिहास चलचित्राच्या रूपात दाखविला-सांगितला जात आहे, हे याचे आणखी एक वैशिष्ट्य मानले पाहिजे. प्रयागराज हे संपूर्ण शहर होर्डिंग्ज आणि बॅनर्सनी सजले आहे. एरवी ते विद्रूप दिसले असते, पण होर्डिंग्जवर महाकुंभमेळ्याच्या माहितीसोबतच आपले चारही वेद, स्कंदपुराण, गरुडपुराण यासह सगळी अठराही पुराणे, त्यातील महत्त्वाची वाक्ये लिहिली असल्याने ते भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाविकही जागोजागी थांबून होर्डिंग्जवरील मजकूर वाचत आहेत. ही बाब म्हणजे या कुंभाचे सगळ्यात मोठे यश मानले पाहिजे. उत्तरप्रदेशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, योगी आदित्यनाथ यांच्यासारखा संन्याशी वृत्तीचा माणूस मुख्यमंत्री आहे आणि असे असल्यानेच हे सगळे घडून आले आहे, हे विसरता यायचे नाही.
 
आपल्यापैकी बर्‍याच जणांना प्रयागच्या बाबतीत काही गोष्टी जशा माहिती आहेत, तशा अनेक बाबी माहिती नाहीत. त्यामुळे प्रयागमध्ये जे होर्डिंग्ज लागले आहेत, त्यावर जी माहिती लिहिली आहे, ती प्रयागला भेट देणार्‍या प्रत्येकाच्या ज्ञानात भर घालणारीच आहे. अमृतकलशातून एक थेंब पडल्याने तीर्थरूप झालेली प्र्रयागची भूमी, 88 हजार ऋषींची तपोभूमी असलेली प्रयागची भूमी, दाही दिशांनी संत या भूमीत येतात आणि या धार्मिक महामेळ्याच्या प्रतिष्ठेसोबतच प्रयागची शान वाढवितात. सृष्टीच्या निर्मितीनंतर ब्रह्मदेवांनी पहिला यज्ञ प्रयाग येथेच केल्याचे वर्णनही होर्डिंग्जवर करण्यात आले आहे. ही माहिती कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहितीही नसेल. त्यामुळे प्रयाग येथे नदीसंगमावर पवित्र स्नानासोबतच ज्ञानाचा हा अनमोल असा ठेवाही आपल्याला संग्रहासाठी मिळणार आहे. खरोखरीच ज्यांच्या कुणाच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली, त्यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे. उत्कृष्टतेमुळे हे प्रयाग आणि प्रधानतेमुळे राज, अशी एक मान्यता प्रयागराजबाबत असल्याचे सांगितले जाते, त्याचा अनुभवही तिथे भेट दिल्यानंतरच येईल, हे निश्चित!
 
प्रत्यक्षात कुंभपर्व हे देशाच्या सांस्कृतिक जीवनाचे आदर्श असे व्यावहारिक उदाहरण आहे. कुंभपर्व आणि या कुंभासारखे जे मेळे देशाच्या विविध भागांत भरतात, त्यामुळे विविधतेत एकतेचे दर्शन सातत्याने घडत राहते आणि आपल्यात राष्ट्रीयतेची जी भावना आहे, त्यात प्राण भरला जात असतो. हेही लक्षात घेतले तर या आयोजनांचे महत्त्वही अधोरेखित होते. प्रत्येक भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे आणि त्याच्या उत्सवप्रियतेमुळेही अशी आयोजने यशस्वी होतात, हेही मान्य करावेच लागेल ना? त्यामुळे कुंभाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय जसे आपण उत्तरप्रदेशच्या सरकारला आणि प्रशासनाला देऊ, तसेच ते तिथे जाणार्‍या कोट्यवधी भारतीय भाविकांनाही द्यावे लागेल, यात दुमत असण्याचे कारण नाही. या अर्थाने पाहिले तर कुंभपर्व हे एक राष्ट्रीय पर्व आहे, असे मानले पाहिजे. कुभपर्वात अमृतस्नान करीत, अमृतपान करण्याचा अनुभव आत्मभावानेच पुष्ट होत असतो, हेही सगळ्यांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. कुंभपर्वाची ही जी भावना आहे, त्यामागे प्रत्येक भाविकाची जिवंत आस्था आणि निष्ठेचा भावच आहे. वास्तविक, या काळात प्रयागराज येथे थंडीचा कडाका असणार. त्यामुळे नदीसंगमावर जाऊन पहाटे कडाक्याच्या थंडीत स्नान करणे सोपे नाही. पण, कसल्याही कष्टांची काळजी न करता कोट्यवधी भाविक 4 मार्चपर्यंत संगमावर हजेरी लावणार आणि सगळ्या अडथळ्यांवर मात करीत पवित्र स्नान करणार, हे केवळ निष्ठा आणि सात्त्विक भावनेमुळेच शक्य होणार आहे...
Powered By Sangraha 9.0