रा. स्व. संघ शिबिरस्थळी आज मातृसंमेलन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :16-Jan-2019
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर 18 ते 20 जानेवारीदरम्यान होणार आहे. त्या निमित्ताने गुरुवार, 17 जानेवारीला दुपारी 4 वाजता मातृसंमेलन होईल. शिबिरस्थळीच म्हणजेच 27 एकर जागेवर वसविण्यात आलेल्या अंबानगरीत हे संमेलन होणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्ष प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधा देशमुख राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रगतिशील महिला शेतकरी पौर्णिमा सवई उपस्थित राहतील. तसेच विदर्भप्रांत संघचालक राम हरकरे, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित असतील.
 
मातृशक्ती ही समाजातील जागृतशक्ती असून तिच्या सहभागाशिवाय मोठे कार्य पूर्णत्वास जात नाही. अमरावतीत होत असलेल्या संघाच्या शिबिरात सुद्धा मातृशक्तीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अमरावतीतील सामाजिक कार्यात मातृशक्तीचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून ही सक्षम मातृशक्ती या कार्यात सहभागी व्हावी, असे संघाला वाटते. त्या अनुषंगानेच हे संमेलन घेण्यात येत आहे. या संमेलनाला महिलांच्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी, सदस्यांनी व समस्त मातृशक्तीतने मोठ्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन आयोजक मातृशक्तीने केले आहे.
तीळलाडूचे होणार संकलन
मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर आयोजित प्रवासी कार्यकर्ता शिबिरात अमरावतीतील मातृशक्तीचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला हे शिबिर आपले वाटावे व आलेले कार्यकर्ते अमरावतीकरांच्या स्नेहाचा गोडवा सोबत घेऊन जावे, यासाठी मातृशक्तीच्या माध्यमातून तीळलाडू संकलन शिबिरस्थळीच होणार आहे.
प्रदर्शनाचे आज उद्घाटन
संघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिर स्थळ परिसरात अमरावतीतील नागरिकांसाठी संघाच्या विविध गतिविधी दर्शविणारे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार, 17 जानेवारीला दुपारी 3.45 वाजता अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख जनार्दनपंत बोथे यांच्याहस्ते होईल. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित असतील.
प्रदर्शन 7 हजार चौरस फूट जागेत राहणार आहे. यातल्या विविध दालनात संघाचे विविध क्षेत्रात चालणारे सेवाकार्य, कुटुंबप्रबोधन, धर्मजागरण, भारतीय विचार मंचाचे कार्य, समग्र ग्रामविकास, गोसेवा, पर्यावरण या विषयावर माहितीफलक, तसेच या क्षेत्रात आतापर्यंत झालेले कार्य दर्शविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रदर्शनी सुरुवात भारतमातेचे दर्शनाने होईल. प्रदर्शनात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर संघाच्या आतापर्यंत झालेल्या मोठ्या कार्यक्रमांची क्षणचित्रे दाखविण्यात येणार आहे. अमरावती जवळ टीमटाला हे गाव आहे ते एकनाथजी रानडे यांचे जन्मस्थान असून विवेकानंद शीला स्मारक निर्माण कार्यात एकनाथजी रानडे यांची भूमिका महत्त्वाची होती. अमरावतीतील नागरिकांना याबद्दलची माहिती व्हावी यासाठी देखावा तयार करण्यात आला आहे.
Tags: