ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 7 आता कायमची बंद

16 Jan 2019 16:29:02
कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये असलेली ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज ७ आता कायमची बंद होणार आहे. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ (Windows 7) चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.
  
पुढील वर्षी १४ जानेवारी २०२० पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे. या दोन्हीमुळे कम्प्युटरची सुरक्षा होत असते. जर ही सुविधा सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. मायक्रोसॉफ्टने गेल्यावर्षीच्या जून महिन्यातच विंडोज 7 चा अधिकृत फोरम सपोर्ट बंद केला होता.
७ जुलै २००९ रोजी मायक्रोसॉफ्टने Windows 7 सादर केले होते. विंडोज 7 नंतर Windows 8 , Windows 8.1 आले आणि त्यानंतर जुलै २०१५ मध्ये कंपनीने Windows 10 आणले. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्यांची संख्या ७० कोटींहून अधिक आहे.
आता कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे यासाठी पैसे मोजावे लागतील कारण इंटरप्राइजेस युजर्स अनेक वर्षांपासून विंडोज 7 चा वापर करत आहेत, त्यामुळे याचा वापर एकदम बंद करणे त्यांच्यासाठी कठीण आहे. पण, सामान्य ग्राहकांना हे अपडेट मिळणार नाहीत हे देखील कंपनीने स्पष्ट केले. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0