केरळ-गुजरात सामन्यात गोलंदाजांचेच वर्चस्व
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :16-Jan-2019
नवी दिल्ली, 16 जानेवारी
वायनाद येथील कृष्णानगरी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या केरळ व गुजरातदरम्यानच्या उपांत्यपूर्व सामन्यात दुसर्‍या दिवशी गोलंदाजांनीच वर्चस्व गाजविले. दुसर्‍या दिवशी केरळच्या 185 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातला 162 धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात 23 धावांची आघाडी मिळविणार्‍या केरळचा दुसरा डाव दिवसअखेरीस 171 धावांवर संपला. केरळने गुजरात संघासमोर विजयासाठी 195 धावांचे आव्हान ठेवले आहे.

 
गुजरातने कालच्या 4 बाद 97 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचा डाव 162 धावात संपला. रूश कलारियाने तेवढी 36 धावांची भर टाकली. केरळच्या एस. संदीप वरियरने 4 बळी, तर बासील थम्पी व निधेशने प्रत्येकी 3 बळी टिपले.
केरळच्या संघाला दुसर्‍या डावातही फारशी चमकदार फलंदाजी करता आली नाही व त्यांचा डाव 171 धावातच संपला. एस. जोसेफने 8 चौकारांसह 56 धावांचे, तर जालाज सक्सेनाने 44 धावांचे योगदान दिले. संघातील निम्मे फलंदाज भोपळा न फोडताच तंबूत परतले. रूश कलारिया व अक्षर पटेलने प्रत्येकी 3 बळी, तर नागस्वालाने 2 बळी व गाजाने 1 बळी टिपला.