रामास्वामी, जाफरची तडफदार शतके

16 Jan 2019 19:52:58
नागपूर, 16 जानेवारी
व्हीसीए जामठा स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्यात दुसर्‍या दिवशी उत्तराखंडच्या 355 धावांना चोख प्रत्युत्तरात विदर्भाने संजय रामास्वामी (112) व वसीम जाफरच्या (111) दिमाखदार नाबाद शतकाच्या बळावर दिवसअखेरीस 69 षटकात एक गडी गमावत 260 धावा काढल्या. विदर्भ अजून 145 धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे 9 गडी शिल्लक आहेत.
उत्तराखंडने कालच्या 6 बाद 293 धावांवरून पुढे खेळताना कालचा नाबाद खेळाडू रावतच्या शानदार शतकाच्या बळावर 355 धावांचा डोंगर रचला. रावतने 162 चेंडूत 15 चौकार व 2 षटकारांसह 108 धावांची शतकी खेळी केली.
विदर्भाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादवने 90 धावात 4 गडी, तर रजनीश गुरबानी व अक्षय वखरेने प्रत्येकी 2 गडी बाद केले. सुनिकेत बिंगेवार व आदित्य सरवटेने प्रत्येकी एक बळी टिपण्यात यश मिळविले.
प्रत्युत्तर देताना विदर्भाचा कर्णधार फैझ फझल व संजय रामास्वामीने 45 धावांची सलामी भागीदारी करून चांगली सुरुवात केली. फझल 5 चौकारांसह 29 धावा काढून बाद झाला. उत्तराखंडच्या धापोलाने त्याला झेलबाद केले. मात्र त्यानंतर संजय रामास्वामी व वसीम जाफरने उत्तराखंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दिवसअखेरपर्यंत विदर्भाच्या डाव सांभाळला आणि आपापले शतक साजरे केले. या दोघांनी नाबाद दुसर्‍या गड्यासाठी 215 धावांची भागीदारी केली. संजयने 212 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावांची शतकी खेळी केली, तर वसीम जाफरने 153 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 111 धावांची शतकी खेळी केली.
 
Powered By Sangraha 9.0