अमेरिकेतेतील ८ लाख कामाशिवाय
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :17-Jan-2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षावर सरकारचे कामकाज अंशत: बंद पडल्याचा ठपका ठेवला आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ५.७ अब्ज डॉलर्सची मागणी करणारा ट्रम्प यांचा प्रस्ताव परिषदेमध्ये विरोधकांनी अडवून ठेवला आहे. अमेरिकेत अंशत: बंदचा हा २४ वा दिवस आहे.
ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले की, अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून मी पाऊल मागे घेणार नाही. या अंशत: बंदमुळे महत्त्वाच्या विभागांच्या आठ लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांकडे काम नाही. लुइसियानात शेतकरी मेळाव्यात बोलताना ट्रम्प म्हणाले की, सरकार फक्त एका कारणामुळे बंद आहे. डेमोक्रॅटिक पक्ष सीमा सुरक्षा, आमची सुरक्षा, आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी पैसे देत नाही.

 
ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर गेल्या आठवड्यात केलेल्या दौऱ्याचा उल्लेख करून सांगितले की, दक्षिण सीमेवरून बेकायदेशीर विदेशी हे फक्त मेक्सिकोतूनच नव्हे, तर इतर देशांतूनही येत आहेत. १५० लोक बेकायदेशीरीत्या सीमेवरून अमेरिकेत आले होते. त्यात तीन लोक हे पाकिस्तानातून, चार मध्य पूर्वेतून आले होते. चीनमधून, तसेच संपूर्ण जगातून लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत येतात, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी जे उपाय आवश्यक आहेत त्याला डेमोक्रॅटस् मान्यता देणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला. यादरम्यान, वाहतूक सुरक्षा प्रशासनाने सांगितले की, विमानतळावर अनेक सुरक्षा स्क्रीनर रविवारी आणि सोमवारी कामावर आले नाहीत.
३० हजार शिक्षक संपावर
समाधानकारक वेतन, वर्गात मर्यादित विद्यार्थिसंख्या आणि जास्त शिक्षकांची भरती करावी या मागण्यांसाठी येथील सरकारी शाळांतील ३० हजारांपेक्षा जास्त शिक्षक सोमवारी संपावर गेले. गेल्या ३० वर्षांत शिक्षकांनी केलेला हा पहिला संप आहे. शाळांच्या संख्येबाबत देशात लॉस एंजिलिस दुसरा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. या संपाचा फटका जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यात शिक्षकांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे.