सरकारच्या शर्तींसह डान्स बारला परवानगी : रणजीत पाटील

17 Jan 2019 17:04:21
नागपूर:
सर्वोच्च न्यायालयाने आज डान्स बारला परवानगी देण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या जाचक अटी रद्द केल्या. त्यामुळे मुंबईसह राज्यातील इतर शहरांत डान्स बार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल संमिश्र स्वरूपाचा असून राज्य सरकारच्या अनेक अटी न्यायालयाने मान्य केल्या आहेत. निकालाची प्रत हाती आल्यानंतर सविस्तर अभ्यास करून याबाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल. मात्र, डान्स बारच्या नावाखाली पुन्हा अनुचित प्रकार सुरू होणार नाहीत असाच सरकारचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली आहे. डान्स बारसंदर्भात राज्यातील जनतेच्या भावना प्रतिकूल आहेत. त्या भावनांचे प्रतिबिंब
निकालात नाही. मात्र, राज्य सरकारने कायदा करताना ज्या अटी टाकल्या होत्या, त्यातील अनेक अटींवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, असे पाटील म्हणाले.


डान्स बारमध्ये अश्लीलतेला कोणतेही स्थान असणार नाही. डान्सबार मालक आणि नर्तिका यांच्यात करार झाला पाहिजे, डान्स बार सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा या वेळेतच सुरू राहावेत, नर्तिकांवर पैसे उधळण्यास मनाई अशा सगळ्या अटी न्यायालयाने मान्य केल्या आहेत, हे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
Powered By Sangraha 9.0