आवारातील भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :18-Jan-2019
टाकरखेडा संभू, 18 जानेवारी
शाळेच्या परिसरात असलेल्या शिकस्त इमारतीची भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टी येथील मणिबाई छगनलाल देसाई विद्यालयात सकाळी 12:30 वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर शेकडो पालक शाळेवर धडकले. त्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयाची तोडफोड केली. यामध्ये कार्यालयाचे नुकसान झाले.
दरम्यान, जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर गावात पोलिस आयुक्तांसह पोलिस पथक दाखल झाले होते. वैभव उर्फ संभा गावंडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो आठवीमध्ये शिकत होता. सार्थक गावंडे, आदित्य बूध, प्रतीक पायताडे, अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भातकुली तालुक्यातील आष्टी येथे मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय आहे. सकाळी 12:30 वाजता येथे कान्व्हेंटला सुटी झाली होती. दरम्यान 11:30 वाजता प्रार्थना झाल्यानंतर सर्व मुले शाळेमध्ये गेली असताना ही चारही मुले शाळेच्या परिसरात असलेल्या शिकस्त झालेल्या जुन्या गायीच्या गोठ्यानजीक उभे होते. याचवेळी इमारतीची भिंत कोसळली. यामध्ये चारही विद्यार्थी दबले, तर वैभवचा जागीच मृत्यू झाला.
 

 
 
घटनेनंतर शिक्षकांसह गावकर्‍यांनी या स्थळी धाव घेतली व जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. घटनेची माहिती वार्‍यासारखी परिसरात पसरताच देवरी निपाणी, अनकवाडी व आष्टी येथील संतप्त पालकांनी शाळेत धाव घेतली. त्यामुळे सीपींसह वलगाव पोलिस स्टेशन, क्युआरटीचे पथक दाखल झाले व गर्दीवर नियंत्रण मिळविले. घटनेची माहिती होताच शाळेचे संचालक आमदार बच्चू कडू यांनीही शाळेला भेट दिली. त्यामुळे गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
घटनेनंतर शिक्षक पसार
ही घटना घडताच मुख्याध्यापकासह शिक्षकांनी तेथून काढता पाय घेतला. हळूहळू गर्दी वाढू लागल्याने पालकांत शाळा व्यवस्थापनाविरोधात रोष दिसून आला.
मदतीची मागणी
आमदार बच्चू कडू यांनी शाळेला भेट दिल्यानंतर संतप्त गावकर्‍यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 25 लाख आणि एकाला नोकरी, तसेच जखमींना 10 लाखांची मदत देण्याची मागणी केली.
शाळेच्या परिसरात शिकस्त इमारत कशी
शाळेचे संस्थापक अध्यक्ष मनसुकलाल देसाई यांनी गायीच्या गोठ्यासाठी 50 वर्षांपूर्वी येथे रुम काढली होती. कालांतराने त्यांच्या मृत्यूनंतर सदर शाळेचे संचालक आमदार बच्चू कडू यांच्याकडे शाळेची जबाबदारी आली. वसु महाराज या शाळेचे अध्यक्ष आहेत. परंतु शाळेच्या परिसरात एखादी इमारत शिकस्त होत असताना शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती अनभिज्ञ असणे म्हणजे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेळीच ही इमारत पाडली असती तर आज ही घटना घडली नसती, अशाच प्रतिक्रिया उमटत आहे.
जखमी खाजगी रुग्णालयात
जिल्हा सामान्य रुग्णालयात या तीनही विद्यार्थ्यांना उपचाराकरिता भरती केले होते. परंतु प्रतीक पायताडे व सार्थक गावंडे यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना लाहोटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच आदित्य बुथ याला रेडियम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करीत मुख्याध्यापकासह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली होती.