गोड बोलण्याचे दिवस...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
आता सगळेच कसे समाजमाध्यमांवर साजरे होत असते. त्यामुळे दिवाळीच्या फटाक्यांपासून संक्रांतीच्या लाडू पर्यंत सगळेच कसे व्हॉटस्‌अॅपवर टाकले आणि ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला!’ असे टाकले की मग हाताचे अंगठे दाखवणे सुरू होते. आजकाल तर पतंगीही व्हॉटस्‌अॅपवरच जास्त उडविल्या जातात. त्यामुळे त्या कटण्याचा प्रश्नच येत नाही. आता संक्रांतीचा तीळगुळ समाजमाध्यमांवरच येत असल्याने आजकाल अत्यंत लोकप्रिय असलेला जो रोग आहे मधुमेह तो असणार्‍यांनाही त्यामुळे काही प्रॉब्लेम जात नाही. आजकाल ‘दीक्षित फॉलो’ करणारेही खूप असतात. त्यामुळे ते चुकून घरी आलेच अन्‌ त्यांच्या समोर तिळगुळाचा लाडू केला तरीही ते छानपैकी ‘नाही’ असे म्हणतात. दिवसातून पंचावन्न मिनिटेच या लोकांचे ‘इनकिंमग’ सुरू असते. एकतर ही मंडळी खूपच आग्रह केला तर चार दाणे कुरतडून खातात लाडूचे. जास्तच स्नेह असला अन्‌ अतिच आग्रह झाला तर मग ही मंडळी लाडू सोबत नेतात अन्‌ रात्रीच्या जेवणात खातो, म्हणतात. त्यातही त्यांना जास्त टीआरपी असलेला मधुमेह जडला असेल तर मग तेही नाही. ते तर गोड खाऊच शकत नाहीत तर मग गोड बोलण्याचा वादा करूच शकत नाहीत. गोड बोलून त्यांची शुगर वाढली तर त्याचे पाप मग ‘गोड गोड बोला’ असे म्हणणार्‍याच्या माथीच लागायचे ना!
तरीही आता गोड बोलण्याचे दिवस आलेलेच आहेत. काय आहे की दिवाळीचे दिवस फटाक्याचे असतात. फराळाचे असतात. फडक्यांचे म्हणजे कपड्यांचे असतात. एकुणातच काय तर ‘फ’चे दिवस असतात. तसेच मग नव वर्ष लागले की एकमेकांवर अवघे वर्षच चांगले, भरभराटीचे जाण्याच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. म्हणजे लोक एकमेकांशी गोड बोलायला सुरुवात करतात. काही तसा संकल्प करतात. नंतर हे संकल्प केवळ कल्पनेतच राहतात. मात्र, या दिवसांत तसेही म्हणायचे नसते. कारण गोड बोलायचे असते. शुभेच्छा द्यायच्या असतात. नंतर ते बोलणे कसे तिळा तिळाने वाढवत न्यायचे असते. दिवसही कसे तीळ तीळ वाढत जातात. उन्हंही वाढतात. गोड बोलण्याचं गुर्‍हाळच मांडलं जातं अन्‌ मग लोक एकमेकांना गोड बोलण्याची इतकी ढील देतात की चक्क नवरा- बायकोही एकमेकांशे गोड बोलतात. त्या गोड बोलण्यात सहसा नवरे घसरतात अन्‌ मग बायको त्यांची पतंग कापते... असे कटी पतंग वाले नवरोबा मग फेब्रुवारीची वाट बघतात. त्या काळांत वसंतोत्सव येतो अन्‌ मग पुन्हा यांचे ‘पॅचअप’ होते.
संक्रांतीला मात्र गोड बोलणे हे मेंडेटरीच असते. एकतर नवे वर्ष सुरू होऊन पंधरवडाही लोटलेला नसतो. यंदा अगदीच काठोकाठ पंधराच दिवस झालेले होते. त्यामुळे गोड बोलण्याचा मोसम सुरू झालेला आहे. तसा या गोड बोलण्याला काहीच अर्थ नाही, असे मानणारेही असतातच, मात्र तसे नाही. या काळांत व्यापार्‍यांपासून घरच्या लोकांपर्यंत सारेच गोड बोलू लागलेले असतात. एकतर सोयरीकी जुळत असतात, जुळवायचे असतात. त्यामुळे वर पालक अन्‌ वधू पालकही गोड बोलत असतात. आता विवाहाचा अन्‌ अर्थ विषयाचा काहीच संबंध नाही, असे म्हणू नका. कारण थो विषयच आर्थिक आहे. ‘‘फार काही नकोच आम्हाला, फक्त लग्न चांगले करून द्या म्हणजे झाले...’’ अशी गोड बोलण्याची सुरुवात केली जाते. वधूपिता आश्वस्त झाला की मग, ‘‘काय आहे ना आजकाल हुंडािंबडा राहिलाच नाही, पण आम्ही आमच्या सुनेच्या अंगावर इतके तोळे सोने घालणार आहोत, तुम्ही त्यापेक्षा किमान दुप्पट तर घालालचना तुमच्या मुलीच्या अंगावर...’’ असेही सांगितले जाते. आता यात ‘आमची सून’ अन्‌ ‘तुमची मुलगी’ यातला फरक समजून घ्यायचा आहे. त्यामुळे त्यांचे त्यांच्याच घरांत राहणार असते आणि नक्की ते तिच्याच अंगावर घातले की नाही, हे तपासताही येत नाही, आपले मात्र त्यांच्या सुनेच्या अंगावर जाणार असते... हे सगळेच कसे वधूपित्याच्या अंगावर येणारे असते; पण इतक्या गोड भाषेत सांगितले जाते की अंगावर येणारेही अंगावर काढण्याच्या पलिकडे काही उपाय नसतो.
मार्च महिन्यात मग अर्थसंकल्प येणार असतो. त्यात आपल्यासाठी काही गोड बातमी येणार काय, याचीही लोक वाट बघत असतात. या काळांत मग आयकर भरावा लागू नये यासाठी इन्कम करणारे सीएशी अन्‌ सीए त्यांच्याशी गोड बोलत असतो. कर नाही तर डर नाही, असे म्हणतात. तो कर म्हणजे ‘करणी’ या अर्थाने आजवर लोक घेत आले आहेत, मात्र तो कर म्हणजे ‘टॅक्स’ असतो. डर असू नये यासाठी कर नसावा याची तजवीज लोक याच काळांत सुरू करतात. त्यामुळे करमुक्त गुंतवणूक कशी करायची, हे सांगत एजंट फिरत असतात. ते तुम्ही त्यांच्या गोड बोलण्यात गुंतून गुंतवणूक करेपर्यंत तुमच्याशी इतके गोड बोलतात की त्याचमुळे तुम्हाला डायबेटीस होण्याची दाट शक्यता असते. एकदा तो झाला की गोड खाणे बंद होते अन्‌ डॉक्टर तुमच्याशी गोड बोलतात... तसा हा तणाव येण्याचाही काळ असल्याने मग स्ट्रेस डायबेटीस होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे मग ताण टाळण्यासाठी गोड बोलणे आवश्यक होऊन बसते!
आता तसेही हे खरोखरीच गोड बोलण्याचेच दिवस आहेत. यंदा तर ते जरा जास्तच आहेत, कारण यंदा निवडणुका आहेत. त्याचा माहोल आतापासूनच सुरू झाला आहे. ज्यांना मते मागायची आहेत ते तर गेली साडेचार वर्षे साधे बोललेही नसतील. ती मंडळी आता चक्क गोड बोलायला लागले आहेत. त्यांच्यात एक अकड होती. झर्रर्रऽऽ गाडीत यायचे अन्‌ फर्रर्रऽऽ निघून जायचे धुरळा उडवीत. आता मात्र ते पायदळ झाले आहेत. जनतेत फिरत आहेत. तुमची अवस्था किती वाईट आहे अन्‌ आम्हीच ती कशी बदलू शकतो, हे समजावून सांगत आहेत. ‘ताई, बाई, आक्का’ अन्‌ ‘भाऊ, दादा, काकां’ना ही मंडळी विचार करा पक्का अन्‌ आमच्यावरच मारा शिक्का असे सांगत आहेत. ज्यांच्यावर जनतेने आधीच शिक्का मारला होता ते आता अधीकच गोड बोलत आहेत. जे बोललो ते करायचेच आहे; पण गेल्या पाच वर्षांत काही वेळच निघाला नाही. सिस्टीम समजून घेण्यातच वेळ गेला. त्यामुळे आणखी पाच वर्षे द्या, असे गोड आवाहन करत आहेत. कालपर्यंत ते घरून विमानतळ आणि तिथून विधिमंडळ असेच होते तेही आता रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याशी नुसतेच नाही तर गोड बोलत आहेत. त्याच्या खांद्यावर हात ठेवून, ‘‘काय रमेश कसं चाललंय? आईची तब्येत कशी आहे?’’ असे नेता अत्यंत आस्थेने विचारतो तेव्हा कार्यकर्त्याची अवस्था, ‘आता रडवाल का साहेब!’ अशी होते अन्‌ तो म्हणतो, ‘‘साहेब मी रमेश नाही, सुरेश आहे अन्‌ माझी आई मरून दहा वर्षे तरी झालेली आहेत...’’ तेव्हा नेताही गोड बोलणे न सोडता, ‘‘अरे, नेमके रमेशचेच नाव तोंडी येते... तू अन्‌ तो सारखेच दिसता ना...’’असे म्हणत सटकत असतो... आता हे असे सुरू झालेले आहेत. नेते यात्रेने येत शेतकर्‍यांपासून सामान्यांची विचारपूस करू लागले आहेत. थोड्याच दिवसांत मतमांगे दारोदार फिरतील अन्‌ ‘दिवस तुमचा येत आहे, तो घरी बसणार नाही’ असे सांगतील. गोड बोलून गळा आवळणे, असा वाक्‌प्रचार काही उगाच आलेला नाही. तेव्हा कुणी आजकाल असे गोड बोलू लागला की त्याला सांगा, ‘‘आम्ही दीक्षित फालो करतो!’’ म्हणजे दिवसातून पंचावन्न मिनिटेच गोड बोला, असे त्यांना सांगा!
------