आणिबाणीतील संघर्षनायिका -विमल नेऊरगावकर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
1962- त्या वेळी आम्ही दरवर्षीप्रमाणे मुंबईला ‘मामाच्या गावाला जाऊ या’ म्हणत मुंबईला गेलो होतो. मोठी बहीण माया 12 वर्षांची, मी 10 वर्षांची, धाकटी जया 6 वर्षांची आणि शेंडेफळ शरद 2 वर्षांचा. शरदच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची आखणी सुरू होती आणि तार आली. त्या काळात काही विशेष सुखदु:खाच्या बातम्या असल्या, तर तार पाठवायची पद्धत होती. ती तार म्हणजे आमच्या कुटुंबावर वज्राघात होता. संघात जातात म्हणून बाबांना नोकरीतून निलंबित करण्यात आले होते. मोठा मामा तेव्हा कार्पोरेशनच्या शाळांचा शिक्षणाधिकारी होता. दोन नंबरचा राम मामा (सध्या उत्तरप्रदेशचे राज्यपाल) खिरा स्टील नावाच्या कंपनीत नोकरी करत होता आणि धाकटा िंबदा मामा सैन्यात अधिकारी. तीनही मामांना त्यांचे संसार, जबाबदार्‍या होत्या, त्यामुळे आम्हाला घेऊन आई लगेच नागपूरला आली. त्या वेळी ती एका खाजगी ट्रेिंनग कॉलेजमध्ये नोकरी करत होती. सही मोठ्या रकमेवर व हातात प्रत्यक्षात अतिशय कमी पैसे अशी गत! बाबांना अर्धा पगार मिळणार होता. आधीच महिन्याची जमाखर्चाची मिळवणी करता करता आई-बाबांची पुरेवाट होत होती. आता तर ही अस्मानी-सुलतानी. शाळांमध्ये पुस्तके विकणे, इतवारीतून ठोक भावात किराणा आणून त्याची घरपोच विक्री करणे, असले छोटे उद्योग करून आई-बाबा घर चालवत होते. त्यांच्या या कष्टांना आम्ही मुली यथाशक्ती हातभार लावत होतो. शाळेत िंकवा इतरत्र कोणी टोमणे मारले तरी आपल्या बाबांनी काहीच चुकीचे केले नाही, याची त्या वयात पक्की जाण होती, हे अजूनही लक्षात आहे. यथावकाश संघानेच बाबांच्या वतीने कोर्टात केस दाखल केली, निकाल बाबांच्या बाजूने लागला व बाबा नोकरीवर पुन्हा रुजू झाले.
 
त्यामुळे, आणिबाणी लागल्यावर बाबांना एक ना एक दिवस अटक होणार, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती. आणि त्यामुळे प्रत्यक्षात त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा खूप दु:ख, भीती अशा भावना आमच्या कोणाच्याच मनात नव्हत्या. फक्त काळजी एकाच गोष्टीची होती, आणि ती म्हणजे हे अंधारपर्व कधी संपणार याची! तोपर्यंत आम्हा दोन मुलींचे विवाह झाले होते. जया एम. एस्सी. करत होती आणि शरद अकरावीत होता. आई ज्या ट्रेिंनग कॉलेजमध्ये नोकरी करत होती ते कॉंग्रेसच्या नेत्याचे होते. आईची नोकरी राहते की जाते, अशी काळजी होती. पण, आता आम्ही मुले तशी मोठी असल्याने आर्थिक िंचता विशेष वाटत नव्हती.
 
पुढे सत्याग्रहपर्व सुरू झाले. जया व शरद दोघेही सत्याग्रह करून तुरुंगात गेले. त्यांना क दर्जा असल्याने, भेटायला गेल्यावर जाळीच्या पलीकडे ते व अलीकडे आम्ही, असे भेटावे लागे. बाबांना मात्र सुरुवातीला जेलरच्या ऑफिसमध्ये व नंतर तर सगळ्या मिसा बंदींबरोबर तुरुंगातील एका मोकळ्या आवारात भेटता येत असे. जया, शरदच्या केसचा निकाल लागून त्यांना काय शिक्षा होणार, हे कळेपर्यंतचा काळ हा आईच्या धैर्याची कसोटी पाहणारा होता. तेव्हा घरी ती एकटीच होती. पण, ती खूप घाबरली आहे, िंचताग्रस्त आहे, असे कधी घडले नाही. ‘रात्रीच्या गर्भात वसे उद्याचा उष:काळ’ यावर तिची ठाम श्रद्धा होती. नंतर नंतर बंधने जरा शिथिल झाल्यावर जेलमध्ये पाठवण्यासाठी पुडाच्या वड्या, बटाटेवडे, गुळाच्या पोळ्या असे पदार्थ ती मोठ्या प्रमाणात करू लागली व ते पोचवायचे काम मी करू लागले. जया, शरद त्यांना झालेली शिक्षा भोगून कारवासातून मुक्त झाले. पण, नंतर कॉंग्रेसचा कुणी नेता नागपुरात येणार असेल तर पोलिस शरदला उचलून नेत आणि नागपूरबाहेर दूर कुठेतरी सोडून देत. अशी अनेक मुले असत. जवळ बस िंकवा रिक्षासाठी पैसे नसत. त्या काळात फोनतर नव्हतेच. त्यामुळेच शरद येईपर्यंत आईचा जीव टांगणीला लागलेला असायचा, पण आपली िंचता कुणाजवळ तिने कधीच बोलून दाखवली नाही.
 
दादा मामा-मामी दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला भेटायला आले होते. मुळात दोघांचा स्वभाव विनोदी असल्याने ते चार दिवस आईसाठी जरा चांगले ठरले. राम मामा भूमिगत होता. सगळे वातावरण कुंद होते. हे अंधारयुग संपणार की नाही, याचीच िंचता वाटू लागली होती. कारण घटनेतील तदतुदीचा फायदा घेत इंदिरा गांधी दर सहा महिन्यांनी आणिबाणीचा कालावधी वाढवतच होत्या. पण हेही दिवस जातील, या विचारावर आई ठाम होती.
 
पुढे निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे राजकीय कैदी सुटले, पण बाबा मात्र आतच होते. निवडणुकांचे निकाल रेडिओवर येऊ लागले आणि रात्री बारापासूनच जेलच्या बाहेर गर्दी जमू लागली. माझे घर व तुरुंग यांच्यामध्ये फक्त नीरीचे जंगल होते. त्यामुळे तुरुंगाच्या आतील व बाहेरील जल्लोश रात्रभर कानावर येत होता. दुपारी तुरुंगातील मिसाबंदींची सुटका सुरू झाली. संध्याकाळी पाचच्या सुमाराला बाबा बाहेर आले. एक प्रतीक्षापर्व संपले होते. आज आई 88 वर्षांची आहे. 5 जानेवारीला बाबांनी वयाची 93 वर्षे पूर्ण करून 94 व्या वर्षात पदार्पण केले. आईला वयोमानानुसार थोडे विस्मरण होते, मात्र आणिबाणीचा तो काळाकुट्ट कालखंड तिच्या काळजावर एखाद्या शिलालेखासारखा कोरला गेला आहे. पण, त्यात स्वत:ला झालेल्या त्रासाच्या आठवणींना जागा नाही. तिच्या नजरेसमोर येतात ती आणिबाणीमुळे उद्ध्वस्त झालेली अनेक कुटुंबे, जी तुरुंगात बाबांना भेटायला गेल्यावर भेटत होती आणि जवळ भाड्यासाठी पैसे नसल्याने जी आपल्या माणसांना भेटूही शकत नव्हती, अशांच्या आठवणी...!