अनंत अमुची ध्येयासक्ती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
सुल्तानी आक्रमणांचा काळा इतिहास आपण मागील लेखात बघितला. एकेकाळी रावण नावाच्या सैतानाने देवी-देवतांचा छळ मांडला होता, आज सुल्तान नावाच्या रावणांनी सामान्य जनतेचा छळ मांडला होता. या बर्बर सुल्तानी आक्रमणांनी इथल्या समाजाची, धर्माची, व्यापाराची, अब्रूची आणि संस्कृतीचीही दैना उडालेली होती. हे बादशहा रावणापेक्षाही शक्तिशाली होत होते, पण त्यांचे कर्दनकाळ प्रभू रामचंद्र दृष्टीस पडत नव्हते. ‘संभवामि युगे युगे’ हा आशीर्वाद आपण भरतभूमीला दिला आहे, याचे विस्मरण साक्षात भगवंताला झाले की काय, अशी सहाशे वर्षे उलटून गेली होती. हा संपूर्ण कालखंड सुल्तानांनी आपल्या बेजरब अत्याचारांनी गाजविला होता.
 
पण, शेकडो वर्षांनी उष:काल झाला. उशिरा का होईना, पण कंसमर्दनासाठी गोकुळात श्रीकृष्ण अवतरला. शिवनेरीवर जिजाऊसाहेबांच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. कवी भूषण म्हणतो-
‘‘राजत है दिनराज को बंस अवनि अवतंस।
जामें पुनि पुनि अवतरे कंसमयन प्रभू अंस।।’’
म्हणजेच, या भूमीस आभूषण ठरणारा हा असा तुझा श्रेष्ठ सूर्यवंश पृथ्वीवर शोभतो. कंसमर्दन करणार्‍या प्रभूचाच अंश पुन:पुन्हा तुझ्या कुळात अवतार घेतो.
 
आऊसाहेबांच्या मांडीवर शिवबा घडत होते. राम-कृष्णाच्या कथा ऐकून झोप लागत नव्हती, कदाचित झोप उडत होती. कितीही प्रतिकूलता असो, अंतिम विजय सत्याचाच होतो, हे मनावर ठासले जात होते. अमर्याद रावणसेनेला रामचंद्रांनी कसे परास्त केले, अकरा औक्षहिणी कौरवसेनेवर सात औक्षहिणी पांडवसेनेने कसा विजय संपादन केला, या गोष्टी खूप काही शिकवून जात होत्या. शत्रुपक्ष नेहमीच शक्तिशाली भासत असतो, संकटे नेहमीच मोठी असतात. पण, जो संकटांशी दोन हात करतो त्याचाच विजय सुनिश्चित असतो. संकटांना घाबरणारी व्यक्ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
 
शिवनेरीवर ‘रामचंद्र’ घडत होते, पुन्हा एक ‘कृष्ण’ आकार घेत होता. दादाजी कोंडदेव (कागदपत्रांतील मूळ नाव ‘दादाजी’ आहे दादोजी नव्हे) यांच्यासारखे कुशल कारभारी चोख व्यवस्था पाहात होते. शिवबाराजांचे वय चौदा वर्षांचे झाले होते. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही आघाड्यांवर प्रचंड अभ्यास सुरू होता. तिथे आळस, कंटाळा हा विषयच नव्हता. ज्यांना खरंच काही करून दाखवायचे आहे त्यांना अभ्यास करावाच लागतो. माझ्या क्षेत्रात जे आवश्यक आहे त्या गोष्टींचा थिअरी आणि प्रॅक्टिकल असा दोहोंचा अभ्यास. त्या क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न. त्यासाठी शाळा-कॉलेज, नोकरी सांभाळून रोज किमान चार-पाच तास देण्याची तयारी. आणि जे शिकून घ्यायचे आहे त्याचा सातत्याने सराव (प्रॅक्टिस) या पद्धतीने ज्ञानाची आराधना करता येते व हेच ज्ञान (नॉलेज) पुढच्या काळात यशाची गुरुकिल्ली ठरते.
 
 
राजांनी प्रचंड मेहनतीने शस्त्र व शास्त्र या दोहोंचा अभ्यास केला. तलवार, पट्टा, भाला, धनुर्विद्या, घोडा आदींमध्ये ते निष्णात झाले. त्यासोबत राज्यशकट कसे हाकावे, खटले कसे चालवावे, सैन्याची व्यवस्था कशी असावी, हेरखाते कसे विकसित करावे, असे राजकारणातील बारकावेसुद्धा आत्मसात केले जात होते. हे सर्व सुरू असतानाच एक विलक्षण घटना घडली. भारतीय प्राचीन संस्कृतीतील एक कौतुकास्पद प्रकार म्हणजे ‘प्रतिज्ञा.’ या सनातन राष्ट्राच्या इतिहासात अशा अनेक प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे,त ज्याचे दाखले आजही दिले जातात. त्या परंपरेला अनुसरून शिवबा अन्‌ त्यांचे निवडक सवंगडी रोहिडेश्वराच्या मंदिरात गेले व स्वत:चे बोट कापून उष्ण रक्ताने रोहिडेश्वर महादेवाला अभिषेक करून त्यांनी शपथ घेतली ती या उन्मत्त यावनी सत्तांचे उच्चाटन करून इथे िंहदवी स्वराज्याची स्थापना करू. आणि ध्येयाने भारलेले, विजयाची आकांक्षा मनी धरलेले, स्वत:च्या मनगटावर विश्वास असलेले हे मूठभर प्रतिज्ञित योद्धे पुढील कार्यास लागले.
मला सातत्याने एक गोष्ट जाणवते की, या लोकांची विचारांची स्पष्टता कशी असेल. मी स्वत: बंगलोरला एका मोठ्या कंपनीमध्ये एच. आर. मॅनेजर होतो. तेव्हापासून आजपावेतो हजार-दीड हजार इंटरव्ह्यूज्‌ (साक्षात्कार) घेण्याचा अनुभव मिळाला. साक्षात्कारात आम्ही नेहमी विचारतो की तुमचे ‘लाईफ मिशन’ (जीवन-ध्येय) काय? आणि आश्चर्य वाटते की, वयाची पस्तिशी-पन्नाशी गाठलेल्या माणसांनासुद्धा आपल्या जीवनाचे ध्येय माहिती नाही. माणूस म्हणून मिळालेला कदाचित हा एकमात्र जन्म, पण त्यातही नोकरीमधून निवृत्त होताना मी कुठल्या पदापर्यंत झेप घेऊ शकतो, माझा व्यवसाय मी कोणत्या उंचीपर्यंत नेऊ शकतो आणि मृत्युसमयी माझी सामाजिक उंची काय राहील? या गोष्टींचे आकलन किती लोकांना झालेले असते सांगा. कदाचित फक्त दहा-पंधरा टक्के लोक. बाकी सर्व आला दिवस जगत असतात. अंगी कर्तृत्व असूनही, नवनवीन स्कील शिकण्याची संधी असूनही, पुढे जाण्याचा मार्ग मोकळा असतानाही अनेक लोक आहे त्याच पदावर काम करीत राहतात.
लिपिक म्हणून लागले, लिपिक म्हणून सेवानिवृत्त. रोखपाल म्हणून आले, रोखपाल म्हणून निवृत्त. असे अनेक शिक्षक, अभियंते, दुकानदार, वकील, पत्रकार, व्यवसायी आपापल्या क्षेत्रात वर्षानुवर्षे जागच्या जागीच राहतात. पदोन्नती जाऊ द्या, पण शिक्षकाला हाडाचा शिक्षक िंकवा अभियंत्याला सर्वोत्तम अभियंता होण्याची स्वप्ने पडतात का? आणि ती नसतील पडत तर ही फार गंभीर बाब आहे. आपल्याला कोणत्या गावाला जायचे आहे हे माहितीच नसेल तर आपण कोणत्या गाडीमध्ये जाऊन बसणार आहोत? आणि मग असे अनेक विद्यार्थी आपले चार मित्र अभियांत्रिकीच्या गाडीमध्ये बसले म्हणून त्याच्या मागे मागे जातात अन्‌ गाडी चुकली म्हणून परत येतात. दुसर्‍या कुणाचा धंदा चांगला चालतोय म्हणून आपणही तोच धंदा सुरू करतात, पण मुळात स्वत:चे व्यक्तिमत्त्व व्यवसायाचे नाही हे न ओळखता आल्याने तोंडावर आपटतात. आपले स्वत:चे व्यक्तिमत्त्व पहिले ओळखावे लागते (सेल्फ असेसमेंट) आणि नंतर आपल्याला कुठे जायचे आहे, ते गंतव्य ठरवावे लागते. एकदा गंतव्य ठरले की विमानाने, रेल्वेने, कारने, बसने िंकवा अजून कुठल्या साधनाने जावे, हे जसे ठरविता येते. अथवा खर्च किती होईल, आराम कसा मिळेल, मुक्काम कुठे करता येईल, इत्यादी मुद्दे स्पष्ट होत जातात. तसेच आयुष्याचे ध्येय ठरले की कोणते स्कील्स शिकावे लागतील, कोणते कोर्सेस करावे लागतील, कुठले तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल, हे सगळे िंबदू लक्षात येतात. तुम्ही कुठलीही नोकरी न करणार्‍या गृहिणी जरी असाल, तरी ‘सर्वोत्तम गृहिणी’ होण्याचे ध्येय ठेवता येते. मग स्वयंपाकामध्ये सुगरण बनणे, घर व्यवस्थित ठेवणे, मुलांना योग्य संस्कार देण्यासाठी काय करणे, पैशाची बचत करून कुठे गुंतवणूक करणे, असे सर्व मुद्दे विचारात घेता येतात.
असे आपापल्या क्षेत्रात काम करताना आपण कुठपर्यंत झेप घेऊ शकतो, याचा सारासार विचार प्रत्येक व्यक्तीने करणे आवश्यक आहे. इतक्या कमी वयात शिवाजीराजे जर जीवनध्येय ठरवू शकतात, तर विश्वास ठेवा आपणही ते ठरवू शकतो. त्यासाठी आपणांस थोडा वेळ स्वत:ला द्यावा लागेल. आपली शक्ती, रुची, आपले क्षेत्र, तिथे उपलब्ध संधी, आपल्या हाताशी असलेला वेळ आणि शिकण्याची इच्छा, याचे योग्य गणित मांडून आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवावे व यशाकडे एक पाऊल अगे्रसर व्हावे.
......