जंगलाचा राजा...!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
वाघ हा जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जातो. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी असून दि. 29 जुलै जागतिक वाघ दिवस म्हणून साजरा केला जातो. वाघ हा मांजरवर्गीय कुळातील प्राणी असून वाघामुळे जंगल टिकून आहेत. जंगलामुळे पाणी जमिनीत मुरते. म्हणूनच भूजल पातळी वाढते. जंगलामुळे नद्या वाहतात, नद्यातून पाणी वाहते. भूजल आणि नदीच्या पाण्यापासून मानव आपली तहान भागवतो. इतकंच नाही तर विहीर व नद्यांचे पाणी शेतीला देतो. म्हणजेच भूजल आणि नदीच्या पाण्याने आपण अन्न उगवतो. शक्तिशाली असलेला वाघ पौराणिक मान्यतेनुसार देवीचे वाहन म्हणून ओळखला जातो. देवीची पूजा तर होतेच, वाघाला देखील देव मानले जाते. दुर्गोस्तव हे त्यातलंच एक उदाहरण म्हणता येईल. वाघ आणि जंगल यापासून प्राणवायू, पाणी व अन्न या आपल्या मुलभूत गरजा पूर्ण होतात. जिथे वाघ नाहीत अश्या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्याच चित्र आहे. भारत आजही वाघांचा देश आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला जगात एक लाख तर भारतात चाळीस हजार वाघ असल्याची नोंद आहे. मात्र आता जगात फक्त चार हजार तर भारतात दोन हजार सहाशे वाघ शिल्लक उरले आहेत. गेल्या शतकात एकूण 97% वाघांच्या संख्येत झालेली घट िंचताजनक असून मानवाच्या अस्तित्वाच्या मुळावर येणारी आहे. आज जगाच्या सर्वाधीक 57 टक्के वाघ जरी भारतात असले तरी ही संख्या अतिशय कमी आहे. वाघांची संख्या कमी करून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतोय. हे भयाण वास्तव देखील आपल्याला कळेनासे झालंय ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.
वाघ जरी आपल्या परिचयाच्या असला तरी वाघाबद्दल आज अनेक गैरसमज जनमानसात आहेत. वाघ हा पुर्णत: मासांहारी प्राणी आहे. वाघाच्या शिकारीचे कौशल्य आगळेवेगळे असून अगडबंब हत्ती सोडल्यास वाघ जमीनीवरील कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यात निपुण आहे. सांबर हे वाघाचे सर्वाधिक आवडीचे खाद्य आहे. चितळ, भेकर, चौिंसगा, रानगवा हे देखील खाद्य असून त्याच्या खाद्याचे रूपांतर प्रदेशनिहाय व उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलत राहते. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात एकटे तर प्रसंगी ते जोडीनेही शिकार करतात. वाघीण आपल्या पिलांना वाढत्या वयात शिकारिचे प्रशिक्षण देते. एकाग्र चित्त, सुमारे अडीचशे ते तीनशे किलो वजन असूनही वाळल्या पानाचाही आवाज होऊ न देता अतिशय शिताफीने आपल्या सावजावर वाघ तुटून पडतो. दबा धरून अधिकाधिक जवळ जाऊन चपळाईने चाल करने वाघाच्या रक्तातच भिनले आहे. प्रौढ वाघ अंदाजे 65 किमी प्रती तासाच्या वेगाने चाल करतो. शिकार मोठी असल्यास गळा पकडून श्वसननलिका फ़ोडने, नखांनी व ताकदवान पंज्यानी जीव जाईस्तोवर धरून संयम ठेवणे. छोट्या प्राण्यांचा तर मानेचा लचका तोडने किंवा पंजाचा एक दणका देखील कवटी फ़ुटायला पुरेसा आहे. वाघाचे आयुष्यमान सुमारे 20 वर्षे असते.
वाघांच्या शिकारीचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. डिस्कवरी अथवा नॅशनल जियोग्राफिक चॅनलवर आपण बहुदा ते पाहतोच. वाघाच्या शिकारीच्या अनेक तर्‍हा आहेत. वाघाच्या शिकारीच्या अनेक युक्त्‌यापैकी एक असलेली युक्ती फार प्रसिद्ध आहे. वानरे झाडावर बसलेली असतांना वाघोबा तिथे येऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. कळपातील एखादेतरी वानर घाबरून खाली पडते. वानर खाली पडले की वाघोबाची सोय झालीच म्हणून समजा....! आहे ना गम्मत...! आहे की नाही वाघोबा हुशार...! मी एकदा ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील तेलिया तलावावर वाघाला चक्क पाण्यात जाऊन सांबर मारताना पहिले आहे. शिकार करण्याची त्याची पद्धत आणि तो रुबाब आजही माझ्या स्मरणात आहे. शिकार केल्यानंतर वाघ आपली शिकार गुहेत किंवा झुडपात लपवून ठेवतो. वाघाच्या शिकारीचा यशाचा दर फक्त 20 टक्के आहे. म्हणजे वाघाने दहा वेळा प्रयत्न केला तर तो दोनदा यशस्वी होतो. प्राण्याच्या आकारानुसार शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरू शकते. एक वाघ महिन्यातून तीनचार वेळा शिकार करतात.

 
वाघ प्रणयक्रिडे दरम्यान अतिशय िंहसक भासतो. समागम करतांना वाघ मोठ्याने डरकाळ्या फोडतो. नर मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. मादीचा गर्भधारणा कालावधी 5 महिने पाच दिवसांचा असतो. वाघीण 3 ते 5 बछड्यांना जन्म देते. काही दिवस वाघीण आपल्या पिल्लांना नर वाघापासून दूर ठेवते. कारण नराच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर नर पिल्लांना मारू शकतो. वाघीण आपल्या पिल्लांना दोन ते अडिच वर्षे सोबत ठेवते. शिकारीचे प्रशिक्षण देऊन पिल्ले शिकार करण्यात पारंगत झाल्यावर ते वेगळे होतात. वाघाच्या एकूण 9 प्रजाती असून आज जगभर वाघ वाचवण्याची मोहिम सुरु आहे. देशात एकूण 50 व्याघ्र प्रकल्प असून महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प वगळता उर्वरित 5 प्रकल्प एकट्या विदर्भात एकवटलेले आहे. वाघाची हत्या, वाघ पाळणे, शिकार करणे तसेच मनोरंजनासाठी वापर आदिवर पुर्णत: बंदी आहे. मात्र तरिही चायनीज औषधी, कातडी व नखांसाठी अजुनही वाघांची हत्त्या होतच आहे. माणसाने शेकडो वाघांच्या शिकारी केल्यात मात्र कायद्यातल्या पळवाटा नीट माहित असल्याने व अनेकदा हे आरोपी हातावर तुरीदेऊन पसार होतात. आज शिकार प्रतिबंधक दलाच्या माध्यमातून काही अंशी शिकारीवर अंकुश मिळविणे शक्य झालं आहे. मात्र गरज आहे ती प्रत्येक जिल्ह्यात हे शिकार प्रतिबंधक दल तयार करण्याची..! तरच जंगलाचा राजाचे आणि आपले भविष्य उज्वल आहे. राजाचे राज्य आणि प्रजा म्हणजे जनता यात आनंदाने नांदेल.