माणसाचे मोठेपण जातीवरुन ठरत नाही : गडकरी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
नागपूर: आमच्या पक्षात जातीचे राजकारण चालत नाही. त्यामुळेच नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्येही आज भाजपाची सत्ता आहे, तसेही, माणूस हा जातीने मोठा होत नसतो,असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मी जात-पात मानत नाही आणि त्यासाठी कोणी माझ्याकडे आले, तर त्याला प्रतिसादही देत नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले. येथे आयोजित भाजपाच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेत गडकरी बोलत होते.

 
भाजपा केवळ उच्च जातीच्या लोकांचा पक्ष असल्याचा भ्रम काँग्रेसने पसरवला. भाजपामध्ये अस्पृश्यता पाळली जाते, असा अपप्रचार काँग्रेसने केला. मात्र आम्ही सामाजिक समानता मानतो आणि त्याच धोरणांवर काम करतो. समाजातून जाती प्रथा नष्ट व्हायला हवी. अस्पृश्यता संपायला हवी, असे मला वाटते. असेही गडकरी यांनी सांगितले.
 
नागपुरातील अनुसूचित समाज कायम भाजपासोबत राहिला आहे. काँग्रेसने बाबासाहेबांवर अन्याय केल्याचे गडकरी म्हणाले. 'बाबासाहेबांनी धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड केली. त्यांनी भंडारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला आणि त्यांचा पराभव केला,' असेही ते म्हणाले. काँग्रेसने बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामातही दिरंगाई केली. 'इंदूमिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न काँग्रेसनं सोडवला नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच तो प्रश्न मार्गी लावला,' असेही गडकरींनी सांगितले.