बदल स्वीकारायला हवे : डॉ. निशिगंधा वाड
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
नागपूर, 19 जानेवारी
बदल स्वीकारायला हवे : डॉ. निशिगंधा वाड
स्वत:ला ओळखणे आणि काळानुरूप बदल स्वीकारणे आज अतिशय आवश्यक असून जोपर्यंत विद्यार्थी स्वत:मधील इच्छाशक्ती जागवत नाही आणि पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होऊ शकत नाही, असे मत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले. विविध किस्स्यांच्या माध्यमातून आणि प्रसिद्ध लेखकांचे दाखले देत त्यांनी आपला विषय खुलविला. त्या पुढे म्हणाल्या, दोन्ही मेंदूंचा समतोल विकास झाला पाहिजे. बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळी (इक्यू, आयक्यू आणि एसक्यू) समप्रमाणात वाढेल अशाचप्रकारच्या शिक्षणाची आज गरज आहे.
 
 
 
आज निव्वळ पोपटपंची करणारे आणि परीक्षार्थी घडविणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. मात्र, स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेले मनुष्य निर्माण करणारे, चारित्र्य घडविणारे आणि प्रखर देशभक्तीची भावना जागविणारे शिक्षण देणे आज आज काळाची गरज आहे. विज्ञार्थ्यांना मातृभाषेची गोडी लावणे ही प्रत्येक घराची जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी परिश्रम केलेच पाहिजे. तसेच शिक्षण पद्धतीत होणारे बदल केवळ वरवरचे असून चालणार नाहीत तर ते मुळापासून असले पाहिजे, असे प्रतिपादनही निशिगंधा वाड यांनी यावेळी केले. शिक्षकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्यार्थ्यांची आवड काय आहे, त्याचा कशात कल आहे, त्यांची कोणत्या विषयात गती आहे हे लक्षात घेऊन मुलांना घडविण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे, असेही डॉ. वाड यांनी नमूद केले.
 
चारित्र्य घडविणारे, नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे व राष्ट्रभक्तीची भावना जागविणारे आणि सर्वांना परवडण्याजोगे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या सर्व पातळ्यांवर विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल, याचा आजच्या शिक्षण पद्धतीत आवर्जून विचार झाला पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृतिकार्यक्रम हाती घेतला पाहिजे, असा सूर तरुण भारत कॉन्क्लेव्हमध्ये आयोजित चर्चासत्रात उमटला. ‘शैक्षणिक व्यवस्थेतील बदलांची काळानुरूप गरज’ हा या चर्चासत्राचा विषय होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष ठाणे येथील प्रा. मिलिंद मराठे, ख्यातनाम अभिनेत्री आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. निशिगंधा वाड, मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.
 
 
माणूस घडविणारे शिक्षण महत्त्वाचे : प्रा. मिलिंद मराठे
आज अनेक विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. डॉक्टर, इंजिनीअर होत आहेत. आपापल्या क्षेत्रात ते तज्ज्ञ आहेत. पण, एक माणूस म्हणून त्यांचे वर्तन कसे आहे, हे देखील तपासले पाहिजे. त्यामुळेच संवेदनशीलता वाढविणारे आणि माणूस घडविणारे शिक्षण आज दिले पाहिजे, असे मत प्रा. मिलिंद मराठे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, आज शिक्षण एवढे महागडे झाले आहे की, सर्वसामान्य माणूस आपल्या मुलांना इच्छा असूनही वैद्यकीय वा अन्य शाखेतील उच्चशिक्षण देऊ शकत नाही. तेव्हा केवळ दर्जेदारच नव्हे, तर सर्वांनाच परवडणारे शिक्षण सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे. जर्मनीत जसे सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध आहे. तशाचप्रकारे भारतातही सर्वांना मोफत शिक्षण दिले तर देशाच्या प्रगतीसाठी ते लाभदायकच ठरेल. या मोफत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांवर व पालकांवर नैतिक दबाब येईल आणि देशासाठी ते याची निश्चितच परतफेड करतील. पूर्णपणे मोफत शिक्षण देणे शक्य नसले तरी निदान ते सर्वांना परवडण्याजोगे निश्चितच असले पाहिजे. आजचे पालक मुलांचे सर्वप्रकारचे लाड करतात. त्यांचा प्रत्येक हट्ट पुरवितात आणि तो आदर्श झाला पाहिजे, अशी अपेक्षा बाळगतात. तसेच मुलांवर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी मात्र शाळा िंकवा महाविद्यालयांवर ढकलतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. आणि 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांशी कसे वागायचे, त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा याचे प्रशिक्षण आधी पालकांना दिले पाहिजे. त्यानंतरच आपल्याला अपेक्षित पिढी घडू शकेल, असे विवेचनही प्रा. मििंलद मराठे यांनी यावेळी केले.

 
विदर्भाचा शैक्षणिक विकास महत्त्वाचा : डॉ. शशिकला वंजारी
सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेला विदर्भ नैसर्गिक साधनसंपत्तीनेही परिपूर्ण आहे. विदर्भात पूर्ण क्षमता असून लोकांचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक असला पाहिजे. दर्जेदार, गुणात्मक आणि मूल्यधिष्ठित शिक्षणाचा विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयोग होईल, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन मूळ नागपूरकर व सध्या मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू असलेल्या डॉ. शशिकला वंजारी यांनी केले. विदर्भाचा शैक्षणिक विकास हा केंद्रिंबदू ठेवून त्यांनी आपला विषय मांडला.
डॉ. शशिकला वंजारी म्हणाल्या, तत्त्वज्ञान- दर्शनशास्त्र, सामाजिक दृष्टिकोन आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या शिक्षणाचा विचार हे तीन घटक सर्वात महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही शिक्षणविषयक तसेच राष्ट्रविषयक संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे. आजच्या शिक्षणात भारताचा बोध होतो काय, याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, याविषयी आजचे विद्यार्थी गोंधळलेले आहेत. नेमके काय करावे, कुठली दिशा धरावी हे त्यांना कळत नाही. विविध पदव्या घेऊनही ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकत नाही. त्यामुळेच रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणाची आज नितांत आवश्यकता आहे. गुजरातकडून विदर्भाला बरेच काही शिकण्यासारखे आहेत. सूरतसारखी व्यापारात आघाडीवर असलेली शहरे देशाच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. गुजरातमधील कुटुंबातील एक मुलगा शिक्षणात तर दुसरा मुलगा आवर्जून व्यापारात असतो. विदर्भातील विद्यार्थी व युवकांनीही स्वत:च्या क्षमता ओळखून उद्योग व रोजगार क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले पाहिजे, असे विवेचनही डॉ. शशिकला वंजारी यांनी यावेळी केले. प्रास्ताविक भूमिका तरुण भारतचे सीईओ सुनील कुहीकर यांनी मांडली. वक्त्यांचा परिचय तसेच सूत्रसंचालन पंकज गणोरकर यांनी केले. यावेळी शिक्षणविषयक चित्रफीतही उपस्थितांना दाखविण्यात आली.