विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर द्या : देशमुख
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
नागपूर, 19 जानेवारी
विदर्भाचा असमतोलपणा लक्षात घेता शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन सिंचन आणि रस्त्यांचे जाळे उभारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यांनी केले.
तरुण भारततर्फे कॉन्क्लेव्ह 2019 अंतर्गत आयोजित ‘सर्वांगीण विकासात रस्ते व सिंचनाची भूमिका’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
रस्ते आणि पाणी हे विकासाचे मूलभूत अंग आहे. या दोन्ही साधनांशिवाय विकास अशक्य आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांमध्ये तफावत आहेत. पांदण रस्त्यांची दुरुस्ती श्रमदानातून केली पाहिजे. त्यातून निघणारी माती, मुरूम आदीची विल्हेवाट गावकर्‍यांनीच लावायला हवी. 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पी. के. देशमुख, आबा खेडकर आणि बियानी यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. परंतु, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्ही विदर्भाचा समतोल विकास करू, असे आश्वासन दिले होते. विकास तर दूरच, विदर्भाकडे दुर्लक्ष करण्यात आले. विकास झाला तो फक्त पश्चिम महाराष्ट्राचा. कॅगच्या अहवालात 2002 ते 2014 या कालावधीत केवळ सात जिल्ह्यांचा विकास करण्यात आला. पूर्व विदर्भातील केवळ भंडारा जिल्ह्याचा विकास करण्यात आला. विदर्भावर सातत्याने अन्याय होत गेल्याने अनुशेष वाढत गेला. हळूहळू हा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. आज पश्चिम विदर्भात 67 टक्के रस्त्यांची कामे झाली आहेत. िंसचनाच्या अभावामुळे प. विदर्भात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही दरी कमी करण्यासाठी विदर्भाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, असेही सुनील देशमुख म्हणाले.

हवामान बदलामुळे पाण्याची समस्या : सुर्वे
सातत्याने हवामानात बदल होत असल्याने विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात िंसचनाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे काही भागात मूबलक पाणी तर काही भागात दुष्काळ अशी स्थिती दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी निसर्गाची जोपासना करणे गरजेचे आहे, असे मत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी व्यक्त केले.
प्रत्येक क्षेत्रानुसार पाण्याची समस्या आहे. शहर आणि डोंगराळ भागात वेगवेगळ्या समस्या आहेत. हवामानातील बदलामुळे मागील 30 ते 40 वर्षांमध्ये सातत्याने बदल होत आहे. मागीलवर्षी मराठवाड्यात भरपूर पाऊस पडला. यंदा कमी पाऊस पडल्याने केवळ 17 टक्केच पाणीसाठा आहे. मार्चनंतर मराठवाड्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र आहे. अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात धरणांची सोय नसल्याने त्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या तीनही जिल्ह्यांमध्ये केवळ 12 ते 18 टक्केच पाणीसाठा आहे. हवामान बदलाच्या समस्येमुळे अनेक आव्हाने प्रशासनासमोर ठाकली आहेत. आपल्या देशात प्रामुख्याने 40 ते 42 दिवसच पाऊस पडतो. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवणे आवश्यक आहे. िंसचनाची समस्या निकाली काढण्यासाठी पाणलोट क्षेत्र निर्माण करून नदी- नाल्यांवरील पाणी अडवून ठेवणे आवश्यक आहे.
प. विदर्भात िंसचनाच्या सोयी नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत हे त्यामागील एक कारण आहे. त्यासाठी शासानातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. मोठ्या प्रकल्पांसाठी खूप जागा लागते. जमिनी संपादन करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही लोक गाव सोडायला तयार होत नाही. त्यामुळे प्रकल्प पूर्ण व्हायला वेळ लागतो. याच कारणामुळे आज गोसेखुर्द प्रकल्पाचे काम लांबले आहे. बंदिस्त नलिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

विहिरींवर भर द्या : भोयर
विदर्भात संत्रा आणि कापूस ही महत्त्वाची पिके आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी आज प्रत्येक जण बोरवेलची मदत घेत आहे. त्यामानाने विहिरींकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, बोरवेल न खोदता गावकर्‍यांनी विहिरी खोदाव्या, असे आवाहन कृषी व जलतज्ज्ञ अनंत भोयर यांनी केले.
रस्ते आणि िंसचन एका प्रक्रियेतील दोन घटक आहेत. विदर्भातील बहुतांश शेती ही डोंगरमाथा आणि उतारावर आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढत नाही. माती वाहून जाते. एक इंच मातीचा थर जमा व्हायला हजारो वर्षे लागतात. सुपीक शेती नष्ट होत आहे. त्यासाठी जलयुक्त शिवाराची योजना आपण उभी करू शकतो. आज जिकडे तिकडे नळयोजना आहेत. त्यामुळे विहिरींकडे दुर्लक्ष झाले आहे. गाव तिथे गावतळे अशा योजनांचा कारभार ग्रामस्थांच्या हाती असावा.
शहरात नवीन रस्ते तयार होत आहेत. मात्र, खेड्यातील पांदण रस्त्यांची काय अवस्था आहे, हे खेड्यात जाऊन पाहावे. त्यामुळे खडीकरणाचे रस्ते प्रत्येकाच्या शेतापर्यंत गेले पाहिजे. एकीकडे दारिद्रय तर दुसरीकडे भरभराट असे चित्र आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. वृक्षकटाईमुळे आज रस्ते निर्जन होत आहेत. त्यामुळे रस्ते तयार करताना एका बाजूकडील वृक्षांची कटाई करावी. विकासासोबतच निसर्गाचा विचार केल्यास जीवनशैली उंचावण्यास मदत होईल, असेही भोयर म्हणाले.
प्रास्ताविक भाषण तभाचे मुख्य संपादक गजानन निमदेव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्मिक अधिकारी उदय भांगे यांनी, तर आभारप्रदर्शन शहर संपादक चारुदत्त कहू यांनी केले. याप्रसंगी एमएसआयडीचे उज्ज्वल डाबे प्रामुख्याने उपस्थित होते.