मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पतीला जाळले जिवंत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
जकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.
 
इंडोनेशियातील या भयानक घटनेनंतर देशभरासह जगभरातील माध्यमांचे या बातमीकडे लक्ष वेधले गेले आहे. इंडोनेशियातील ट्रिब्युन जांबी या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. इंडोनेशियातील वेस्ट नुसा टेंगारा येथे 12 जानेवारीला ही खळबळजनक घटना घडली असून, यामध्ये पतीचा मृत्यू झाला आहे.
 
इलहाम काहयानी (वय 25) हिने पती डेडी पुरनामा (वय 26) याच्याकडे मोबाईलचा पासवर्ड मागितला. पतीने तिला पासवर्ड देण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि मारहाणीपर्यंत हे वाद गेले. याच रागातून इलहामने पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला लाईटरने पेटवून दिले. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.या दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होत होते. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.