संघाच्या पहिल्या अल्पसंख्याकाचे निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
कर्जत : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत धर्मजागरण आयामाचे प्रमुख प्रल्हाद शिंदे (वय ५२) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. पूर्वाश्रमीचे गुलशन अब्दुल्ला शेख हे माथेरानच्या लहानपणापासूनच संघ शाखेत जाऊ लागले. पुढे १९८५ ते १९९१ या काळात त्यांनी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते (प्रचारक) म्हणून सुरूवातीला पनवेल व पेण आणि पुढे गोव्यात काम केले. संघाचे पहिले मुस्लीम प्रचारक ही त्यांची विशेष ओळख होती. हिंदू तत्वज्ञानाने प्रेरित होऊन त्यांनी पुढे आपल्या कुटुंबीयांसह हिंदू धर्मात प्रवेश केला. शुक्रवारी सकाळी त्यांच्या अंत्ययात्रेत समाजाच्या विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
उत्तम संघटक असलेल्या शिंदे यांनी शालेय सेवक म्हणून नोकरी करतानाही संघाच्या विविध दायीत्वांचे निर्वहन केले. पुढे त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे काम आले. श्रीरामजन्मभूमी हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय होता. तसेच रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त, पुरोहित व धर्माचार्य यांच्याशी त्यांचा जीवंत संपर्क होता. मंगळवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. वैद्यकीय तपासणीमध्ये ब्रेन हॅमरेजचे निदान झाल्यावर त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व पुढे पनवेलच्या पटवर्धन रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु तब्येत ढासळत जाऊन शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.
अखेरचा श्वासही संघ सान्निध्यातच
गेल्या आठवड्यात कर्नाळा अभयारण्याजवळील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी शिरढोण येथे संघाच्या महाविद्यालयीन कार्यकर्त्यांचे एक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातही प्रल्हाद शिंदे यांचे श्रीरामजन्मभूमी या विषयावर एक ओजस्वी व्याख्यान झाले होते. पुढे अवघ्या २ दिवसांत त्यांची तब्येत खालावली. मात्र त्यांचे शरीर उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमधून पनवेल येथे रा. स्व. संघ – जनकल्याण समितीने उभारलेल्या पटवर्धन रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे नातेवाईक व अनेक जिवलग सहकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच त्यांनी अंतिम श्वास घेतला.