...तर 'ठाकरे' प्रदर्शित होऊ देणार नाही
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या  25 जानेवारीला देशभरात  प्रदर्शित होणार आहे. परंतु , याला आता संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत असून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पायात पादत्राणे घालून पुष्पहार अर्पण करताना दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे चित्रपटातील हे दृश्य महाराजांचा अपमान करणारे आहे. चित्रपटातील हे दृश्य निर्माता आणि दिग्दर्शकांनी तात्काळ वगळावे अन्यथा या दृश्यासह चित्रपट जर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात एकाही ठिकाणी तो प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व मोठे आहे, त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या चित्रपटाला विरोध करण्याचे अन्य कोणतेही कारण नाही, असेही ते पुढे म्हणाले.