कारंजेकरबाबांनी महानुभाव पंथाला संघाशी जोडले : सरसंघचालक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :19-Jan-2019
अमरावती : कारंजेकरबाबा व माझे गेल्या अनेक वर्षांपासूनचे संबंध होते. त्यांनीच महानुभाव पंथासोबत रा. स्व. संघाला जोडले. हे संबंध दृढ होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, अशी शोकसंवेदना सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केली.
 
कारंजेकर बाबा उर्फ गोविंदराज बाबा यांचे 18 जानेवारीला मुंबई येथे उपचारादरम्यान देहावसान झाले होते. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव अमरावतीच्या कंवरनगरातील महानुभाव आश्रमात आणण्यात आले होते. प्रवासी कार्यकर्ता शिबिरासाठी अमरावतीत मुक्कामी असलेले सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शनिवारी सकाळी 7.30 वाजताच्या  दरम्यान ते कारंजेकर बाबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आश्रमात पोहोचले.
 
मोहनजींनी बाबांच्या पार्थिवावर पुष्पअर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महानुभाव आश्रमाचे मोहनदादा अमृते व अन्य महंत उपस्थित होते. कारंजेकर बाबा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अमरावती येथील महानुभाव आश्रमाचे मुख्य संचालक होते. पुढे आपल्या शोकसंदेशात मोहनजी म्हणाले, कारंजेकरबाबांच्या जाण्याने मोहनदादा अमृते यांचा जसा आधार गेला, तसाच तो माझापण गेला आहे. संघाशी चांगले संबंध राहावे, ते वाढावे यासाठी त्यांचा नेहमीच आशीर्वाद राहिला असे मोहनजी म्हणाले. मोहनजींसोबत विदर्भ प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, अमरावती विभाग कार्यवाह शिवा पिंपळकर, अमरावती महानगर कार्यवाह संजय गुळवे उपस्थित होते.