इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती : मुख्यमंत्री फडणवीस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
नागपूर : काँग्रेसला मुंबईतील इंदू मिलची जागा हडपायची होती, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथे आयोजित भाजपाच्या विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

काँग्रेसला इंदू मिलची जागा हडपुन आपल्या बापाचे स्मारक उभे करायचे होते , पण संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, 2020 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. परंतु, आता तसे करणे काँग्रेसला शक्य होणार नाही, कारण आम्ही तसे होऊ देणार नाही. अनुसूचित जातींसाठी भाजपाने काम केले आहे.
 

 
 
याचबरोबर, ते म्हणाले की, भाजपाने जनतेसाठी सौभाग्य योजना आणली. या योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज, एलईडी बल्ब पोहोचले. उज्ज्वला योजनेद्वारे घराघरांत गॅस जोडणी आणि शेगडी उपलब्ध करुन दिली. ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला त्यापैकी 60 टक्के घरे  ही अनुसूचित जातींमधील लोकांची होती.
 

 
 
विजय संकल्प सभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि भाजपाचे अनेक नेते  उपस्थित होते.