अकोला शहरात १ कोटी रुपयांची वीज चोरी उघड
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
अकोला: महावितरणकडून अकोला शहरात जुन २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान राबविण्यात आलेल्या वीजचोरी मोहिमेमध्ये महावितरणच्या अभियंत्यांनी तथा भरारी पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहरातील तीनही उपविभागात भारतीय विद्युत कायद्यानुसार एकूण २५९ जणांवर कारवाई केली आहे. जवळपास १ कोटी ११ लाख रुपयांची चोरी व गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले असून, यामध्ये ११ जणांविरुद्ध पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे, तसेच ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आले आहेत.

 
 
वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर आहे. याविरोधात ठोस पाऊले उचलत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवत वीज चोरांविरूध कारवाई करून ११लाख ६६ हजार ५५७ युनिट्सची वीज चोरी व गैरवापर उघड केला आहे. या वीजचोरी बाबत ग्राहकांना देण्यात आलेल्या १ कोटी ११ लक्ष रुपयांच्या बिलापोटी १८५ ग्राहकांकडून ८५ लक्ष रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. तसेच १५० ग्राहकांकडून वीज चोरी प्रकरणी नियमाप्रमाणे तडजोड करून १२ लक्ष रुपये रकमेचा भरणा शासनास केला आहे.
 
वीज चोरीच्या देयाकाचा भरणा न करणाऱ्या तसेच नियमाप्रमाणे तडजोड न करणाऱ्या ११ वीज चोरांविरुद्ध अकोट फैल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांच्या नेतृत्वात अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर सिरसे, अजितसिंह दिनोरे व गणेश महाजन तसेच भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता संतोष राठोड यांच्या पथकातील अभियंते कर्मचारी व जनमित्रांनी केली आहे.
वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण प्रशासन गंभीर असून शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून यापुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने धडक मोहिम राबवूनआकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून देणारे तांत्रिक सूत्रधार सुद्धा महावितरणच्या रडारवर आहेत. ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे तसेच नियमितपणे वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन आवाहन अकोला शहर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दाणी यांनी केले आहे.