ममतांनी कोलकात्यात मोठी सभा केली. लाखो लोक होते. असणारच. त्यात घुसखोरी करून आलेल्या मुस्लिमांची संख्या लक्षणीय होती. बंगालमधील झाडून सर्व मुस्लिम समुदायाचे लोकही असणारच. फतवाच काढला होता ममतांनी. सब लोक आना चाहिये. त्यांना ममता हव्या आहेत. बंगालच्या जनतेला ममता नको आहेत. कारण, हिंदू धर्माची, संस्कृतीची उपेक्षा आणि मुसलमानांचे लांगुलचालन, विरोधी पक्षांची मुस्कटदाबी असे अनेक प्रकार ममता करीत असतात. त्यांच्या या कारभाराला लोक कंटाळले आहेत. ममतांना भीती वाटते की, भाजपाला मोकळे रान मिळाले तर आपली धडगत नाही. म्हणून, त्या विरोधकांच्या सभा, मेळावे, यात्रांवर बंदी घालत आहेत. स्वत: मात्र सर्व लहानसहान, थकल्याभागल्या नेत्यांना एकत्र आणून शक्तीप्रदर्शन करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या विरोधात एवढे सर्व पक्ष ? यापूर्वी असे कॉंग्रेसच्या काळात घडत होते. आता भाजपाला हटविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. ममतांनी मोदींना बंगालमध्ये रोखून दाखवले, असे कॉंग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. आता प्रश्न असा निर्माण झाला की, या सभेला राहुल गांधी आणि सोनिया गांधी अनुपस्थिती का ? त्याचे कारण म्हणजे या मायलेकांना ममतासोबत युती हवी आहे तर कार्यकर्त्यांचा या युतीला प्रखर विरोध आहे. ज्या ममतांनी आमच्या कार्यकर्त्यांचे खून पाडले, त्यांच्याशी आम्ही मुळीच युती करणार नाही. प्रश्न असा पडतो की, मोदींची एवढी भीती कशासाठी? सभेतही मोदींची भीती नेत्यांना सतावत होती. डीएमकेचे सर्वेसर्वा एम. के. स्टालिन म्हणालेही, मोदी पुन्हा सत्तेत आले तर देश पन्नास वर्षे मागे जाईल. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मजेदार विधान केले. आगामी पंतप्रधान कोण, याचा निर्णय जनता घेईल! याच अखिलेश महाशयांनी बहेन मायावतींसोबत युती करताना, अगला प्रधानमंत्री युपीसे होगा असे विधान केले होते. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या हस्तक्षेपामुळे हैराण झालेले मुख्यमंत्री कुमारास्वामी मात्र मनापासून बोलले.
भारत हा एकता आणि विविधतेने नटलेला देश आहे. प्रादेशिक पक्षांनी जनतेला सोबत घेऊन आपल्या राज्याचे हित समोर ठेवूनच काम करावे. फारूख अब्दुल्लांनी फार चांगली सूचना केली. संपूर्ण देशात उपस्थित सर्व नेत्यांनी एकास एक असा उमेदवार भाजपाच्या विरोधात उभा करावा. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानीसारख्या चिल्लर नेत्यांपासून तर शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, यशवंत सिन्हासारख्या अडगळीत पडलेल्या नेत्यांसह हे 22 नेते होते. पण, काही प्रमुख मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती होती. त्यात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे पलानीस्वामी उपस्थित नव्हते. चंद्रशेखर राव यांनी तर स्पष्टच शब्दात ममतांना आधीच सांगून टाकले होते की, ज्या मंचावर कॉंग्रेस असेल, तेथे मी जाणार नाही. कारण, राव यांना गैरकॉंग्रेसी आणि गैरभाजपा आघाडी तयार करायची आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांना देशातला सगळ्यात मोठा विदूषक म्हटले होते. आधी कर्नाटकात सर्वांना एका मंचावर आणण्याचे नाटक घडले. त्यावेळी मायावती तेथे होत्या. पण, नंतर मात्र त्या या सर्वच लोकांपासून दूर गेल्या. त्या ममतांच्या सभेला गेल्या नाहीत, माहोलचा आंखो देखा रिपोर्ट मिळावा म्हणून खा. सतीशचंद्र शर्मा यांना मात्र पाठविले. या सभेला दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचा एकही नेता तेथे नव्हता. कारण, ममता म्हणजे दोन्ही कम्युनिस्टांचा कट्टर शत्रू. सर्वात अधिक पंचाईत या कम्युनिस्टांचीच झाली आहे.
आधी पश्चिम बंगाल, नंतर त्रिपुरा हातून गेले. आता केवळ केरळ तेवढे वाचले आहे. आता कॉंग्रेससोबत युती करावी की करू नये, यावरून माकपाच्या दोन गटातच मारामार सुरू आहे. तिकडे केरळमध्ये मोदींच्या सभांना अलोट गर्दी होत आहे. त्यामुळे तेथे आपले सरकार सांभाळण्यासाठी विजयन यांच्या नाकी नऊ येत आहेत. तर असा हा ममतांचा मेगा सभेचा सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीला अजून दीड महिना बाकी आहे. या दीड महिन्यात कोण कुणासोबत राहतो, हे लवकरच कळेल. केजरीवाल यांनी कॉंग्रेससोबत युती करण्यास नकार दिला. मायावतींनी कॉंग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला. पण, आले एका व्यासपीठावर. तोंडदेखलेपणा करण्यासाठी. ममता सभेत म्हणाल्या, या सरकारची एक्स्पायरी डेट संपून गेली आहे. दिल्ली मे सरकार बदल दो...त्या तावातावाने बोलल्या. पण, हा ताव आचारसंहिता घोषित झाल्यानंतर किती काळ कायम राहतो, हे पाहणे मनोरंजक ठरेल.
ममतांनाही लोकसभेतआपला दबदबा दाखवायचा आहे. त्यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. असे झाले तर मायावती आणि ममता यांच्यातच संघर्ष उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. मायावती या अतिशय महत्त्वाकांक्षी आणि धूर्त नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अखिलेश यादव यांना अगदी पद्धतशीरपणे गाठून त्यांना आपल्यामागे फरफटत आणण्याची यशस्वी कसरत त्यांनी करून दाखविली आहे. अगला प्रधानमंत्री उत्तरप्रदेशसे होगा, हे वदवून घेण्यात मायावती सफल झाल्या आहेत. आता खरी परीक्षा तर अखिलेशची होणार आहे. अजून कोणत्या मतदारसंघात कोणाचा उमेदवार असेल हे ठरलेले नाही. ते ठरेल तेव्हा काय स्थिती निर्माण होईल, हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे. शरद पवार ममतांच्या सभेला आले, ही पवारांची योग्यता, मोठेपण कमी झाले का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, शरद पवार हे सर्वांत जुने आणि अनुभवी नेते आहेत. त्यांना एका पक्षाच्या व्यासपीठावर हार्दिक पटेलसारख्या व्यक्तिसारखी वागणूक देणे आणि पवारांनी ती मान्य करणे ही बाबही राष्ट्रवादीच्या भविष्याच्या दृष्टीने बरीच सूचक आहे. असो. पवारांनी युतीबाबत आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे.
राज्यांमध्ये जागावाटप करताना, राज्यात प्रबळ असलेल्या किंवा सत्तेत असलेल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्यात हा त्यांचा मंत्र. हा इशारा कॉंग्रेससाठी आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यांना महाराष्ट्रात कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा हव्या होत्या. पण, त्यात ते यशस्वी झाले नाहीत. पवारांना केंद्रात स्थिर सरकार नको. अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यास शरद पवार हे सुद्धा पंतप्रधानपदाचे सर्वमान्य उमेदवार असू शकतात, असे सर्व पक्ष मान्य करतील हा त्यांचा समज. स्वप्ने पाहायला काहीही लागत नाही. त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर असा हा सारा मामला. ममतांची सभा सुरू असताना, गुजरातेत पंतप्रधान मोदी देशाचे लष्कर मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील होते.
स्वदेशनिर्मित 155 मि. मी. स्वचलित होवित्झर तोफा बनविण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन करीत होते. यामुळे आमची लष्करक्षमता वाढणार आहे. वास्तविक पाहता विरोधकांच्या मनात मोदी नावाची धडकी भरण्याचे कारण म्हणजे, आतापर्यंत ज्या विकासयोजना गेल्या साडेचार वर्षांत राबविल्या गेल्या, त्या जर जनतेपुढे आवर्जून आणल्या गेल्या, तर त्याचे उत्तर विरोधकांजवळ नाही. शिवाय भ्रष्टाचाराविरुद्ध मोदींनी कठोर धोरण अवलंबिले आहे. त्या फटका अनेक विरोधी नेत्यांना बसला आहे. मोदींनी अजून पत्ते उघड केले नाहीत. विरोधकांना भीती वाटते की, मोदी निवडणुकीआधी मोठ्या घोषणा करतील. म्हणून त्यांना मोदी नको आहेत. पण, जनता सर्वोपरी आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.