Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटला विजेतेपद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये पुरूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली. तर भारतीयांमध्ये नितेंद्रसिंग रावत आणि सुधा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष व महिला गटात वर्चस्व राखले.

यंदा अव्वल दहामध्ये एकाही भारतीय धावपटूला स्थान मिळवता न आल्याने भारताची निराशा झाली. मुख्य मॅरेथॉनच्या पुरूष गटात केनियाच्या कॉसमस याने इथियोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडताना २:०९:१५ अशी बाजी मारली. आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या धावपटूंनी रौप्य व कांस्य पटकावले.
महिलांमध्ये इथियोपियाच्या धावपटूंचा दबदबा राहिला. वॉर्कनेश अलेमू हिने अनपेक्षित निकाल नोंदवत गतविजेती अमाने गोबेना हिला मागे टाकले. अलेमूने २:२५:४५ अशी वेळ नोंदवून बाजी मारली. अलेमूच्या धडाक्यापुढे गतविजेत्या गोबेना हिला २:२६:०९ अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इथियोपियाच्याच बिर्के देबेले हिने २:२६:३९ वेळेसह कांस्य जिंकले. त्याचवेळी एकूण क्रमवारीत भारताच्या सुधा सिंगने ८वे स्थान पटकावले.
 
भारतीय महिला गटात मध्य रेल्वेच्या सुधा सिंगने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना २:३४:५६ अशी वेळ दिली.
सुधा सिंगने या कामगिरीसह जागतिक अजिंक्यपद स्पधेसाठी पात्रताही मिळवली. यासोबतच तिने मुंबई मॅरेथॉनचा जुना विक्रमही मोडीत काढला. महाराष्ट्रची ज्योती गवते २:४५:४८ वेळेसह दुसऱ्या स्थानी आली, तर जिगमेट डोलमानने ३:१०:४३ वेळेसह तिसरे स्थान मिळवले.
भारतीय पुरुषांमध्ये नितेंद्रसिंग रावत याने बाजी मारताना गतविजेत्या गोपी थोनकल याचे आव्हान परतावले. नितेंद्रसिंग याने २:१५:५२ अशी वेळ नोंदवून सुवर्ण यश मिळविले. गतविजेत्या गोपीला २:१७:०३ वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. करण सिंग याने २:२०:१० अशी वेळ देत कांस्य जिंकले.