खेळांसाठी शाळेत एक तास राखीव : जावडेकर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
पुणे : खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला अग्रेसर बनविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळाला स्थान देणे आवश्यक आहे. सशक्त भारताच्या निर्माणासाठी आता यापुढे प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

 
 
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यात आयोजित खेलो इंडिया युथ गेम्सच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. जावडेकर पुढे म्हणाले की, देशातील क्रीडा क्षेत्रातील युवकांना संधी मिळावी, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया उपक्रम सुरू केला. यानिमित्ताने देशभरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभाशाली खेळाडू आपल्याला मिळाले आहेत. खेळाच्या माध्यमातूनच सशक्त भारत निर्माण होणार आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच खेळ सुध्दा महत्वाचा भाग आहे. क्रीडांगणावर खेळताना निघणारा घाम हेच खेळाडूंचे खरे बक्षीस असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
तावडे म्हणाले, खेलेगा महाराष्ट्र तो खेलेगा राष्ट्र. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांचे मी आभार मानतो, त्यांनी महाराष्ट्राला खेलो इंडियाचे आयोजन करण्याची संधी दिली. देशभरातून येथे खेळाडू आले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी शाळेच्या 55 हजार विद्यार्थांनी हजेरी लावली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात राज्याच्या क्रीडा विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचे अथक परिश्रम आहेत. ही स्पर्धा यशस्वी करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ पहिला आला याचा मनस्वी आनंदच आहे, मात्र, संपूर्ण जगात क्रीडा क्षेत्रात भारताने अव्वल स्थान गाठावे हीच अपेक्षा आहे.