पंतप्रधान ३ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर मध्ये; लडाखला विभागीय दर्जा देणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते  विविध विकासकामांचे उद्घाटन आणि नव्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. आज भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी याबाबत माहिती दिली.

 
माधव म्हणाले की, पंतप्रधान आपल्या जम्मू-काश्मीर दौऱ्यात ३५ हजार कोटींच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत. तसेच ते राज्यातील ९ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करतील. तसेच मोदी लेह, जम्मू आणि श्रीनगरालाही भेट देणार आहेत. जम्मूत ते एका रॅलीला संबोधित करणार आहेत, असेही माधव यांनी सांगितले.
 
पंतप्रधान आपल्या जम्मू भेटीत एम्स, आयआयएम, आयआयटी, जम्मू-आखनूर मार्ग, शाहपूर-कांदी मार्ग, सुंदरबनी महाविद्यालय आणि आयआयएमसीची पायाभरणी करतील. तसेच कठुआ येथील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि जम्मूतील रोप-वे चे उद्घाटन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माधव यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीवर टीकास्त्र सोडले. राज्यातील अनेक विकासकामे पीडीपी नेत्यांतील इच्छाशक्तीच्या अभावामुळे रखडल्याचा आरोप माधव यांनी केला.
भारतीय जनता पार्टी जम्मू-काश्मीरमधील तिन्ही भागांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. लडाखसाठी स्वतंत्र विभागाचा दर्जा आणि पहाडी भाषा बोलणाऱ्यांसाठी आरक्षण देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने काम करू, असेही माधव म्हणाले.