राफेल करारात भारताने चुकती केली अर्धी रक्कम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
भारताने ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी ५९ हजार कोटी रुपये म्हणजेच एकूण रकमेपैकी अर्ध्याहून अधिक रक्कम चुकती केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान राफेल विमाने  भारताला मिळणार आहेत.
 
 
सर्व तंत्र आणि साधनांनी युक्त असलेली पहिली १३ राफेल विमाने सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत तयार असणार आहेत. एकूण रकमेपैकी सुमारे ३४,००० कोटींची रक्कम माइलस्टोन लिंक्ड इन्स्टॉलमेंट म्हणून देण्यात आलेली आहे. उर्वरित १३ हजार कोटी इतकी रक्कम वर्षभरात चुकती करण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
सप्टेंबर २०१६मध्ये पहिल्या करारावर सह्या केल्यानंतर पहिला १५ टक्क्यांचा हफ्ता देण्यात आला होता. त्यानंतर, विमाने  भारताला मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम दिली जाईल असा ठराव करण्यात आला होता.
सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून अंबाला आणि हसमारा हवाईतळांची उभारणी करण्यात आली आहे.यावर्षी सप्टेंबरमध्ये फ्रान्समध्ये पहिल्या चार जेट विमानांचे वितरण केले जाईल, त्यानंतर सुमारे १० पायलट, १० फ्लाइट अभियंते आणि ४० तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, मे २०२०मध्ये ही विमाने हरयाणातील अंबाला एअरबेसवर पोहोचतील.अंबाला आणि हसीमारा हवाई तळांवर प्रत्येकी १८ राफेल विमानांचा ताफा तैनात ठेवण्याचे हवाई दलाने ठरवले आहे.