वृद्धेच्या सादेला संजय राठोडांची साथ
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
नेर -‘संजूबाबू मले रस्ता करून दे न. या रस्त्यावरून चालतानी लय काटे रूतते. चालणं कठीण झालं. मले जाण्यासाठी चांगला रस्ता करून देणं!’ वृद्ध कमलाबाईची ही भावपूर्ण साद ऐकून महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनीही तितक्याच तत्परतेने साथ दिली आणि अवघ्या चार दिवसात त्या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. एखाद्या चित्रपटाचा प्रसंग शोभावा, अशी ही घटना नेर तालुक्यातील उमरठा येथे घडली. या निमित्ताने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या संवेदनशीलतेसोबतच कर्तव्यतत्परता जनतेने पुन्हा एकदा अनुभवली.
 
तालुक्यातील उमरठा येथील कमला पांडुरंग गुल्हाने ही वृद्ध महिला नित्यनेमाने लगतच्या बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात पूजा करायला जाते. मात्र, मंदिरात जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगड, धोंडे, काटे आणि झुडुपांचाच पसारा. कमलाबाईच्या श्रद्धेपुढे या गोष्टींना थारा नव्हता. अशा काटेरी वाटेवरून त्या नित्यनेमाने महादेवाची पूजा करायला जायच्या.
 
कोणीतरी कमलाबाईला संजय राठोड यांच्याकडे रस्ता माग ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील, असा सल्ला दिला. योगायोगाने गेल्या आठवड्यात संजय राठोड या मार्गाने जात असताना मंदिरातून अनवाणी परतणार्‍या कमलाबाईंना ते दिसले. आजीने त्यांना हक्काने थांबवून घेतले. कमलाबाईंचे रक्ताळलेले पाय आणि रस्त्याच्या वेदना सांगताना आलेल्या डोळ्यातील असवांनी संजय राठोडसुद्धा भावविवश झाले.

 
त्यांनीही आत्मीयतेने आजीबाईंना मी काय मदत करू असे विचारल्यावर ‘मले जायले तेव्हढा चांगला रस्ता करून दे’ असे सांगितले. ‘देव तुह्या नेहमी पाठीशी हाये!’ कमलाबाईंच्या या शब्दावर संजय राठोड यांनी लागलीच प्रशासनाला या रस्त्याचे काम आठ दिवसात मार्गी लावण्याचे आदेश दिले. 18 जानेवारीला या रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाल्याने कमलाबाईंनी आनंद व्यक्त केला. संजय राठोड यांची कार्यतत्परता आणि कमलाबाईंचा प्रेमळ हट्ट यामुळे बारा ज्योतिर्लिंग मंदिरास आता बारमाही रस्ता मिळाल्याने नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.