धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार: डॉ. विकास महात्मे
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :20-Jan-2019
वाशीम : आजपासून सुरू झालेला आरक्षणाचा आक्रोश चाळीस दिवस राज्यभरात चालूच ठेवा. आपल्याला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. राज्यभरातील मराठा समाजाने एकजूट दाखवून आरक्षण घेतले. त्याच धर्तीवर येत्या 40 दिवसांत धनगर समाजानेही एकजूट दाखवून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने लढा द्यावा आणि शासनाला आरक्षण देण्यास बाध्य करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी येथे पार पडलेल्या महामेळाव्यात केले.
 

 
 
धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी वाशीम येथे काटा-कोंडाळा रोडवरील खुल्या प्रांगणात भव्यदिव्य स्वरूपात आक्रोश महामेळावा पार पडला. पूढे बोलताना डॉ. महात्मे म्हणाले की, राज्यशासनाने गेल्या साडेचार वर्षांत धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही. आता केवळ 40 दिवसांचा अवधी उरला आहे. त्यात आरक्षणाच्या जल्लोषाचा पिवळा रंग उडवायची संधी नाही मिळाली, तर निवडणूकीनंतरचा लाल गुलालही राज्यकर्त्यांना उधळू देणार नाही, असे ते म्हणाले. धनगर समाज भीक मागत नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानात दिले आहे, तोच आरक्षणाचा हक्क मागत आहोत. त्यामुळे यापुढे हयगय झाल्यास धनगर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलनाची धार अधिक तीव्र करेन. त्यासाठी समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.
 
युवा नेते गोपीचंद पडळकर म्हणाले, जो राजकीय पक्ष धनगर समाजाला आमदार, खासदारकीची संधी देईन, त्याच्याच पाठीशी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत समाज उभा राहीन. उत्तमराव जानकर यांनी जर आरक्षण मिळाले नाही तर सरकार अरबी समुद्रात नेऊन बुडवा असा इशारा दिला. आरक्षण आक्रोश महामेळाव्यास राज्यभरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली.