रस्ते विकासासाठी 30 हजार कोटी : चंद्रकांत पाटील
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
कोल्हापूर
राज्य शासनाने रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम हाती घेतला असून, यंदा 30 हजार कोटींचा निधी केवळ रस्ते विकासासाठी उपलब्ध करून दिला आहे. यातून राज्यभर रस्ते विकासाचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. हातकणंगले तालुक्यात विकासकामांच्या शुभारंभी ते बोलत होते.
 

 
 
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी रस्ते विकासासाठी 17 हजार कोटींची तरतूद केली होती. यंदा 30 हजार कोटी रुपयांचा निधी ठरवण्यात आला आहे. याशिवाय कें द्र सरकारकडून 1 लाख 6 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणत मागील चार वर्षांत 22 हजार किलोमीटर्सचे सीमेंट क्रॉंक्रिटचे चार पदरी रस्ते करण्याचा क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे येत्या मार्चनंतर रस्त्यांची बहुतांशी कामे पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
आरोग्य स्वच्छता मोहिमेबद्दल मंत्री पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे काम देशात उल्लेखनीय झाले आहे. घराघरात शौचालय निर्माण झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त केला आहे. आरोग्यामध्ये तर आयुष्यमान भारत योजनेसारख्या क्रांतिकारी योजनेने फार मोठी मदत केली आहे. जगातील सर्वात मोठी योजना म्हणून आयुष्यमानकडे पाहिले जात आहे. देशातील 10 कोटी कुटुंबातील 50 कोटी लोकांना लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.