305 सीसीचे इंजिन अन्‌ 10 अश्वशक्तीची ताकत‘टेकेलॉन्स 2019’ चा आविष्कार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
अमरावती
305 सीसीचे इंजिन, 10 अश्वशक्तीची ताकत व अख्खा ट्रॅक्टर एवढे वजन वाहून नेण्याची क्षमता, अशा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कारने अंतिम फेरी गाठली आहे. पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘टीम ऑप्टिमेक’नेही धमाल केली आहे.
 
चित्कारा विद्यापीठ चंदीगढ येथे आभासित ढाचा चाचणी परीक्षेत 200 पैकी 161 गुण घेऊन या मॉडेल कारने पात्रता फेरीत सहज स्थान प्राप्त केले आहे. अमरावती विभागातून प्रथम मानांकन प्राप्त करीत अंतिम फेरीमध्ये कारची निवड झालेली आहे.
6 फूट लांब व 4 फूट रुंद असलेल्या या कारचे वजन 180 किलो असून, 620 एन. एम. टॉर्क या गाडीला आहे.
 

 
 
स्वयंनिर्मित ऑटो ट्रान्समिशनवर आधारित गाडीचे इंजिन असून संपूर्ण ढाचा हा विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आला आहे. इंजिनची ताकत बघता ही कार प्रतिलिटर 45 कि. मी. धावेल , अशी तयार करण्यात आली असून कुठल्याही रोडवर धावण्यास सक्षम आहे.
 
अंतिम फेरीकरिता ही कार पंजाब येथील आय.आय.टी. रोपर येथे मार्चमध्ये सहभागी होणार आहे.
ही कार तयार करण्यासाठी अभिषेक खाडे व पीयूष मगरदे यांच्या नेतृत्वात 25 विद्यार्थी प्रचंड मेहनत घेत होते. महाविद्यालयातील वर्कशॉपमध्येच या कारची निर्मिती करण्यात आली असून प्रा. सागर खाडे यांच्या देखरेखीखाली विभाग प्रमुख डॉ. पी. एस. अर्डक यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.