भारत, विराटचे अव्वल स्थान कायम
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
दुबई: 
ऑस्ट्रेलियात पहिली कसोटी मालिका जिंकण्याबरोबरच भारतीय संघ आणि त्याचा कर्णधार विराट कोहली या दोघांनीही आज  जारी झालेल्या आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत आपापले अव्वल स्थान कायम राखले आहे.
  
भारतीय संघ ११६ गुणांसह प्रथम मानांकित कसोटी संघ म्हणून कायम आहे, तर कर्णधार कोहली (९२२ गुण) न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनपेक्षा (८९७) २५ गुणांनी समोर आहे. या मालिकेत चमकदार फलंदाजी करणार्‍या चेतेश्वर पुजाराने तिसरे मानांकन मिळविले, तर युवा फलंदाज ऋषभ पंतने अव्वल २० क्रमांकात स्थान मिळविले आहे. पंतने कारकीर्दीतले सर्वोत्तम १७ वे स्थान प्राप्त केले आहे.
 
 
 
गोलंदाजीच्या क्रमवारीत कगिसो रबाडा अजूनही प्रथम स्थानावर कायम आहे. रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम स्थान मिळविले असून त्यांना अनुक्रमे पाचवे व नववे स्थान मिळाले आहे.
 
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ७११ गुणांसह १५ व्या क्रमांकावर झेप मारली आहे. इंग्लंडला आपले तिसरे स्थान कायम राखण्यासाठी आगामी बुधवारपासून वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी तीन सामन्यांची मालिका जिंकणे आवश्यक राहील, तर त्यानंतर ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्यात होणारी दोन सामन्यांची मालिका गुण संपादन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील.