कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात वाघाने केली वाघिणीची शिकार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
भोपाळ : मध्यप्रदेशातील कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात एक दुर्मीळ प्रकार समोर आला आहे. अभयारण्य परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वाघिणीचा मृत्यू मानवी हस्तक्षेपामुळे झालेला नसून एका वाघानेच तिची शिकार केली असल्याचा  खुलासा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
          
        
वाघ हा मांसाहारी असला तरी तो स्वजातीमध्ये कधीच शिकार करत नाही. मात्र, कान्हा राष्ट्रीय अभयारण्यात हा नवीनच आणि दुर्मिळ प्रकार समोर आला आहे.  या अभयारण्यात देशभरातील २० टक्के तर, जगातील १० टक्के वाघ आहेत.
अनेक मांसाहारी प्राणी आपल्या पिल्लांना खातात. तसेच काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये वाघही आपल्या छाव्यांना खाताना आढळून आले आहेत. मात्र, आत्तापर्यंत प्रौढ वाघानेच प्रौढ वाघाला खाल्ल्याचा प्रकार समोर आला नव्हता. अश्या प्रकारची ही पहिलीच घटना आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या शिकारीत प्रचंड घट झाली असल्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या वाघांनी एकमेकांना भक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ही मृत वाघीण कमकूवत पडली असावी, असा वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.