शॉर्टसर्कीटमुळे धावती बस पेटली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
बुलडाणा, 21 जानेवारी
जळगाव खान्देश येथून चिखलीला जाणार्‍या प्रवासी एसटी बसला बुलडाणा शहरात गणेश नगर जवळ शॉर्ट सर्कीटमुळे धावत्या बसला आग लागली या घटनेत संपुर्ण गाडी जळाल्याची घटना सोमवार, 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. चालकांच्या प्रवसंगावधाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही मात्र, संपुर्ण बस जाळल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या बसमध्ये 28 प्रवासी प्रवास करीत होते.

 
 
जळगाव खान्देश येथून चिखलीकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बस क्रमांक एम. एच. 40 वाय 5345 ही दुपारी 3 वाजेच्या दरम्यान मलकापूर रोडवरून शहरात प्रवेश करीत असताना गणेश नगर या ठिकाणी बसच्या वाअरींगमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन धुर निघाल्याचे चालक एस. टी. परिहार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतील वाहक महेंद्र सदावर्ते व प्रवाश्यांना सुचना देऊन तातडीने संपुर्ण गाडी रिकामी केली. दरम्यान शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी, बस संपुर्ण जळाल्याने राज्य परिवहन महामंडळाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
 
 
 
आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवासी व परिसरातील नागरिक धावून आलेत. तातडीने बुलढाणा नगर पालिकेच्या अग्निशामन दलास बोलाविण्यात आले. व आगीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी चालक एस. टी. परिहार याने बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस तपास करीत आहे.