चीनची आर्थिक प्रगती तीन दशकांच्या नीचांकावर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
बीजिंग : अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे निर्यात मंदावल्याने चीनच्या आर्थिक प्रगतीने तीन दशकांचा नीचांक गाठला आहे. तिसर्‍या तिमाहीत चीनचा आर्थिक विकासदर ६.६ टक्के नोंदवण्यात आला.
 

 
 
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत चीनचा आर्थिक विकासदर ०.१ टक्क्याने घसरला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेत झालेल्या घसरणीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
 
२०१८ मध्ये अर्थव्यवस्थेचा वेग ६.६ टक्के असल्याची घोषणा चीनच्या केंद्रीय सांख्यिकी विभागाने (एनबीएस) आज केली. मागील वर्षीचा विकासदर २०१७ मधील ६.८ टक्क्याच्या विकासदरापेक्षा कमी होता. चीनचा नीचांकी ३.९ टक्क्याच्या विकासदराची नोंद १९९० मध्ये करण्यात आली.
 
आर्थिक विकासदराचे लक्ष्य ६.५ टक्के ठेवण्यात आले होते. नोंदवण्यात आलेला ६.६ टक्क्याचा दर त्यापेक्षा जास्तच असल्याचे एनबीएसच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. तिसर्‍या तिमाहीत आर्थिक विकासदराची नोंद ६.५ टक्के नोंद करण्यात आली. चौथ्या तिमाहीत यामध्ये घसरण होऊन तो ६.४ टक्क्यावर आला.
 
चीनच्या मंदावलेल्या आर्थिक विकासदराचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडण्याची भीती वर्तवली जात आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा परिणाम चिनी अर्थव्यवस्थेवर झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.