सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामी यांचे निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
बंगळुरू
प्रख्यात लिंगायत धर्मगुरू आणि कर्नाटकच्या तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांनी आज सोमवारी देह त्यागला. ते 111 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. शिवकुमार स्वामीजी यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वामीजींना पद्मभूषण आणि कर्नाटक रत्न यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
 
स्वामीजींच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर, त्यांच्यावर मागील 8 डिसेंबर रोजी चेन्नई येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अनेक उपचार करूनही, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला, अशी माहिती स्वामीजींनी स्थापन केलेल्या सिद्धगंगा शिक्षण सोसायटीने दिली. स्वामींचा जन्म कर्नाटकातील वीरपूर गावात 1 एप्रिल 1908 रोजी झाला होता, तर, त्यांनी स्थापन केलेल्या श्री सिद्धगंगा शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर 1 एप्रिल 1907 अशी त्यांच्या जन्मतारखेची नोंद आहे.
 
 
 
शिवकुमार स्वामीजी यांच्या निधनाची बातमी समजताच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी तातडीने मठात दाखल झाले. त्यांनी राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांनाही एक दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:ख
शिवकुमार स्वामीजी यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोिंवद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ यांनी शोक व्यक्त केला आहे. गरीब आणि वंचितांकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे स्वामीजींनी सामाजिक अन्यायाविरोधातही सातत्याने लढा दिला. त्यांच्या निधनाने जगभरातील त्यांच्या अनुयायांना मोठा धक्का बसला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.