विरोधकांच्या नकारात्मक प्रचाराने मोदींचीच ताकद वाढेल : अरुण जेटली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :21-Jan-2019
नवी दिल्ली :  कोलकात्यातील  तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या रॅलीची खिल्ली उडवत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी आज महाआघाडीवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींचा विरोध करणे आणि निवडणुकीचे गणित बसवणे या दोनच उद्देशाने हे विरोधी पक्ष एकत्र आल्याचा आरोपही त्यांनी केला. जे पक्ष कधी एक दुसऱ्यांचे चेहरेही बघायलाही तयार नव्हते ते आज एका मंचावर  आले आहेत, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा सर्व प्रचार मोदीकेंद्रीत नकारात्मक राहिलेला असून त्यांच्याकडे एकही सकारात्मक मुद्दा नसल्याचे जेटली म्हणाले.
 
 
विरोधकांची कोलकत्यातील सभा ही फक्त मोदीविरोधीच नव्हे तर राहुल गांधीच्या विरोधातही होती, असे जेटली म्हणाले. या सभेत राहुल गांधींव्यतिरिक्त मायावती, केसीआर हे पंतप्रधानपदाचे उमेदवारदेखील उपस्थित नव्हते, असा चिमटा त्यांनी यावेळी विरोधकांचा काढला. एकाही विरोधी नेत्याने या सभेत भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार मांडले नाहीत. सगळ्यांनी आपल्या भाषणात मोदींवर टीका करत त्यांची नकारात्मकताच दर्शवल्याचे जेटली म्हणाले.
मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची प्रगती होत असून त्यामुळे जनता मोदींच्या कमर खुश आहे, त्यामुळे घाबरून एकत्र आलेले विरोधी पक्ष हा त्याचाच दाखला असल्याचे जेटली यावेळी म्हणाले. भाजपा आगामी लोकसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मत मिळवण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीतील विरोधकांचा नकारात्मक प्रचाराने मोदींचीच ताकद वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य जनता समजदार असून गोंधळाऐवजी स्थिरतेलाच प्राधान्य देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.